पर्यावरणाविषयी सकारात्मक वातावरण निर्मितीची गरज-सागर भुजबळ
पुरंदर प्रतिनिधी-सजीव सृष्टीचे अस्तित्व हे आजूबाजूच्या पर्यावरणावर अवलंबून आहे.आपल्या हव्यासापोटी मानवाने पर्यावरणाची अपरिमित हानी केली असल्याने पर्यावरण संवर्धनाची जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे,पर्यावरणीय समस्या व त्याचे संवर्धन याविषयी जागरुकता निर्माण करणे आणि पर्यावरणाच्या विषयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी यासाठी सकारात्मक वातावरणाची निर्मिती करणे गरजेचे असल्याचे मत सागर भुजबळ यांनी व्यक्त केले.
आज दि.५जुन युवा नेते सागर भुजबळ यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत अनाठाई होणाऱ्या खर्चाला फाटा देत जागतिक पर्यावरण दिन महर्षी वाल्मीकी विद्यालयात वेगवेगळ्या प्रकारची कुंडीसह झाडे देऊन साजरा करत इतर युवकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या या उपक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक अतुल गायकवाड, बाबुराव काकडे,वसंत गायकवाड यांसह प्रदीप चव्हाण,रोहित भोसले, दीपक भुजबळ, आदेश पवार, विपुल भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.