बारामती ! जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात प्रशासनाच्यावतीने स्वागत
बारामती : 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' अशा भावानेसह भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती तालुक्यात आगमन झाले.
मौजे उंडवडी गवळ्याची ( गुंजखिळा) येथे प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत केले. दिंडी प्रमुख, विणेकरी यांचा शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे आषाढी पायी वारी रद्द करण्यात आली होती. यंदा कोणत्याही निर्बंधाविना वारी होत असल्याने वारकऱ्यांची अलोट गर्दी पहावयास मिळत आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माउली तुकाराम' चा जयघोष करताना वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
प्रशासनातर्फे वारकऱ्यांसाठी सुविधा
बारामती तालुक्यात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम उंडवडी गवळयाची व बारामती शहरात शारदा प्रांगण या ठिकाणी असतो. आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बारामती तालुक्यातील प्रशासन, बारामती नगरपरिषद, पंचायत समिती, पोलीस विभाग, आरोग्य विभागाच्यावतीने तयारी केली आहे. पाणी, विजे, वैद्यकीय पथके, पालखी मार्गाचे वेळापत्रक, फिरते सुलभ शौचालय, कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून ध्वनीक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येत आहे.