मुंबई ! माती वाचवा अभियानामुळे मातीविषयी जनजागृती होण्यास मदत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सदगुरु जग्गी वासुदेव मुख्यमंत्र्यांना भेटले
मुंबई दि 12 : ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरू जग्गी वासुदेव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन 'माती वाचवा' या आपल्या जागतिक मोहिमेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या मोहिमेला शुभेच्छा देताना पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांविषयाही सांगितले. मातीची गुणवत्ता तसेच संवर्धन करण्यासाठी सुरू असलेल्या या मोहिमेला महाराष्ट्राचा पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सदगुरु जग्गी यांच्याकडून मोहिमेदरम्यान आलेले अनुभव यावेळी जाणून घेतले तसेच पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात व्यापक स्तरावर काम सुरू आहे असे सांगितले. या भेटीच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राघवेंद्र शास्त्री व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
मातीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्याच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव यांनी ही मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 27 देशांमधून 25000 किमीची यात्रा त्यांनी पूर्ण केली असून देशातल्या 5 राज्यांतून फिरत ते महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.