Type Here to Get Search Results !

ग्रहगोल अनेक...आपली वसुंधरा फक्त एक!ब्रह्मांडात अनेक आकशगंगा आहेत, त्यात अनेक ग्रहगोल सामावले आहेत.पण...आपली वसुंधरा फक्त एकच आहे. चला, तिचे रक्षण करण्याचा, तिला जपण्याचा निर्धार करूया!

ग्रहगोल अनेक...आपली वसुंधरा फक्त एक!
ब्रह्मांडात अनेक आकशगंगा आहेत, त्यात अनेक ग्रहगोल सामावले आहेत.पण...आपली वसुंधरा फक्त एकच आहे. चला, तिचे रक्षण करण्याचा, तिला जपण्याचा निर्धार करूया!

पर्यावरणातील तापमान मानव आणि निसर्गाच्यादृष्टीने अत्यंत वेगाने वाढते आहे.  यामुळे अनेक सजिवांचे अधिवास नष्ट होण्यासोबत पृथ्वीवरील एक दशलक्ष प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. प्रदूषणामुळे हवा, पाणी आणि भूमीची गुणवत्ता घसरते आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी आपल्या वसुंधरेला आणखी हानी होण्यापासून वाचवणे हा एकमेव पर्याय आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या विषयावर चर्चा आणि कृती अपेक्षित आहे.

पन्नास वर्षापूर्वी स्टॉकहोम घोषणेला अनुसरून केनियातील नैरोबी येथे ५ जून १९७२ रोजी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. त्याला यावर्षी ५० वर्षे पुर्ण होत असल्याने स्टॉकहोम+५० उपक्रमाच्या माध्यमातून जगभरात वसुंधरेच्या रक्षणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न आणखी महत्वाचे ठरतात.

जागतिक तापमान वाढीची समस्या
जग वेगाने पुढे जात असताना पर्यावरणाची परिस्थिती आणखी नाजूक होत आहे. घनकचऱ्याचा प्रश्न, जंगलाचे कमी होणारे क्षेत्र, समुद्राची वाढती पातळी, ध्रुवीय प्रदेशाचा वितळता बर्फ, पूर, वादळ, प्रदूषीत नद्या, प्लास्टिकचा वाढता वापर, तापमान वाढ, लहरी हवामान अशा अनेक समस्या आपल्यापुढे आहेत.  जागतिक तापमान वाढ  १.५ अंशापेक्षा कमी ठेवण्यासाठी हरितगृह वायू उत्सर्जन निम्मे करण्याची गरज आहे. आत्ताच पर्यावरणाचा विचार न केल्यास वायू प्रदूषणाचे प्रमाण ५० टक्के वाढेल आणि पर्यावरणात मिसळणारा प्लास्टिक कचरा २०४० पर्यंत तिप्पट होईल.

अजूनही वेळ गेलेली नाही
या सर्व समस्येच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी समाजाला सर्वसमावेशक आणि न्याय्य विकास प्रक्रीयेसाठी प्रवृत्त करावे लागेल. यासाठी आवश्यक स्वस्त तंत्रज्ञान उपलब्ध असणे ही आशेची आणि उत्साह वाढविणारी बाब आहे. शाळकरी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुण भविष्यातील अनुकूल बदलांचे प्रमुख शिलेदार आहेत. त्यांच्यापर्यंत विषयाचे गांभिर्य पोहोचविणे संस्था आणि समाजातील प्रबुद्ध नागरिकांची जबाबदारी आहे. तरुणांना केवळ पर्यावरण विषयाच्या एखाद्या उपक्रमात सहभागावर समाधान न मानता शाश्वत विकासाच्या संकल्पना पुढे नेण्यासाठी संशोधनात सहभाग आणि त्यादृष्टीने नवे कौशल्य शिकण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.

आपण काय करू शकतो
परिसंस्थेचा घटक म्हणून निसर्गाकडून बरेच काही मिळवताना निसर्गाला आणि पर्यायाने वसुंधरेला जपण्यासाठी आपण अत्यंत छोट्या कृतीतून योगदन देऊ शकतो. प्लास्टिकचा वापर बंद करणे, घनकचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे, पाण्याचा मर्यादीत वापर, सौर ऊर्जेचा वापर, ई वाहने किंवा सायकल सारख्या वाहनांचा उपयोग, सार्वजनिक वाहतूक सुविधेचा अधिकाधिक वापर, सेंद्रीय शेतमाल खरेदी, फ्रीज, वातानुकुलन यंत्रणेचा मर्यादीत वापर, इमारतीभोवती जलपुर्नभरण व्यवस्था, वृक्षारोपण, कागदाचा वापर कमी करणे, जलस्त्रोतांतील कचरा स्वच्छ करण्याचे उपक्रम,  अशा लहान लहान बाबी महत्वाच्या ठरतील. सामुहीकरित्या वृक्ष संवर्धनही तेवढेच महत्वाचे आहे.

निसर्गासोबत सहचर्य ठेवूनच आपल्या वसुंधरेचे रक्षण शक्य आहे आणि त्यासाठी त्वरीत कृती गरजेची आहे.  हे संकट प्रत्येकाच्या दारात आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपली भूमीका समजून घेतल्यास, त्याविषयी इतरांशी चर्चा केल्यास आणि परस्परांच्या सहकार्याने सकारात्मक कृती केल्यास ही वसुंधरा आपल्यासाठी आनंददायी अधिवास ठरेल. 

वसुंधरेच्या अंगाखाद्यांवर खेळणारे प्राणी-पक्षी, बहरणारे वृक्ष-वेली, खळखळणाऱ्या नद्या हे तिचे वैभव आहे. ते नष्ट होतांना तिला होणाऱ्या वेदना आपल्या रोजच्या जीवनाचा भाग होण्याआधी तिची आर्त हाक ओळखून आत्ताच एक पाऊल पुढे टाकू या, आपल्या गावात, शहरात, परिसरातील पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमात सहभागी होऊया...शेवटी आपली एकच वसुंधरा आहे...आपल्याला पोसणारी, वाढवणारी, आपल्या अंगाखांद्यावर खेळवणारी!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test