पुरंदर ! निरा-वाल्हा रेल्वे गेट प्रवाशांसाठी धोकादायक
पुरंदर प्रतिनिधी – पुरंदर तालुक्यात पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील वाल्हे ते निरा दरम्यान थोपटेवाडी हद्दीतील रेल्वे फाटक (क्रमांक २७) हे केवळ रेल्वे रुळाच्या असमतोल पणामुळे प्रवाशांसाठी धोकादायक ठरू लागले आहे.
पुणे मिरज लोहमार्गावर थोपटेवाडी हद्दीतील रेल्वे फाटकावर रेल्वेच्या दुहेरीकरणाहेतू नव्याने रूळ टाकण्यात आले आहेत. मात्र या रेल्वे रुळाचा व रस्त्याचा ताळमेळच जुळत नसल्याने फाटक ओलांडताना अनेक दुचाकीस्वार चक्क रुळावरूनच घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत .तर कित्येक प्रवाशांसह भाविकांना देखील अपघाताला सामोरे जावे लागल्याने रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अशातच माउलींचा पालखी सोहळा या मार्गावरूनच मार्गस्थ होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून रेल्वे फाटकातील अंतर्गत लोहमार्गाच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घ्यावे अशी मागणी युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख सागर भुजबळ यांनी केली.