Type Here to Get Search Results !

कोऱ्हाळे बु. येथील शेतकरी अजित पोमणे यांनी कलिंगडातून घेतले लाखाचे उत्पन्न

कोऱ्हाळे बु. येथील शेतकरी अजित पोमणे यांनी कलिंगडातून घेतले लाखाचे उत्पन्न

सोमेश्वरनगर -  बारामती तालुक्यातील शेतकरी नेहमीच शेतीत  नाविन्यपूर्ण प्रयोग करून चांगले उत्पादन घेण्यात आघाडीवर असतात.  बाजारात मागणी असलेला शेतमाल आपल्या शेतात पिकवावा या संकल्पनेतून मौजे कोऱ्हाळे बु.  येथील शेतकरी अजित  पोमणे यांनी  श्री सिद्धीविनायक हायटेक रोपवाटिका आणि शेडनेट हाऊसची उभारणी केली आहे. त्यातून ते  परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची  रोपे,  फळे  उपलब्ध करुन देत त्यांनी उत्पन्न वाढविले आहे. सोबत उन्हाळ्यात कलिंगडाच्या शेतीच्या माध्यमातूनही साडेतीन लाखाचे उत्पन्न मिळविले.

पोमणे यांनी २०१२ पासून शेतात नव्या तंत्राचा वापर करण्यास सुरूवात केली.  ज्वारी, बाजरी  व गहू या पिकातून १८ एकरच्या शेतात मिळणारे अल्प उत्पन्न लक्षात घेता त्यांनी बागायती शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. शेतात ऊस, कलिंगड, कांदा, वांगी, टोमॅटो ही नगदी पिके घेऊ लागले. या शेतीतून फायदा झाल्यामुळे सन २०१४ मध्ये ३ हजार  पक्षांचे २ पोल्ट्री शेड उभे केले. या पोल्ट्री व्यवसायातून सुद्धा चांगल्याप्रकारे आर्थिक फायदा होऊ लागला. 

व्यवसायाचा फायदा शेतीसाठी झाला. त्यानंतर दरवर्षी साधारणपणे ऊस १०  एकर,  कलिंगड १ एकर, वांगी १ एकर,  बटाटा १ एकर व  आले १ एकर अशी नगदी पिके घेऊ लागले. भाजीपाला पिकांपासून चांगला आर्थिक फायदा होऊ लागला. परंतु भाजीपाला रोपे लागवडीसाठी रोप खरेदीवर मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ लागला. यामुळे स्वतःचीच रोपवाटिका उभी करण्याचा निर्णय अजित पोमणे  यांनी घेतला. 

मागील वर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून १०  गुंठे क्षेत्रावर अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेअंतर्गत श्री सिद्धीविनायक हायटेक रोपवाटिका स्थापन केली. रोपवाटिकेसाठी भाजीपाला रोपे विक्रीचा परवाना घेतला. रोपवाटिकेसाठी कृषी विभागाकडून २ लाख ३० हजार रुपये अनुदान मिळाले. या वर्षी कृषी विभागाकडून आणखी एक शेडनेट गृह मंजूर झाले. यामुळे आणखी  एका रोपवाटिकेची निर्मिती केली असून अधिक क्षमतेने उत्तम दर्जाची रोपे निर्माण केली जात आहेत.
रोपवाटिकेसाठी जवळपास १५ ते १६ लाख रुपये खर्च आला.  शासनाच्या कृषी विभागाकडून यासाठी ७  लाख १० हजार रुपये  अनुदान प्राप्त झाले. रोपवाटिकेमध्ये कलिंगड, खरबूज, वांगी,  मिरची, टोमॅटो, शेवगा व ऊसाच्या रोपांची निर्मिती केली जाते. 

ग्राहकांची गरज ओळखून परिश्रमपूर्वक नवा मार्ग स्विकारल्याने पोमणे हे शेती व्यवसायात यशस्वी ठरले आहे. ‘विकेल ते पिकेल’ सोबतच ‘नव्या तंत्राने पिकेल’ ही संकल्पनादेखील शेतात राबविल्याने त्यांची वाटचाल आर्थिक समृद्धीकडे सुरू आहे.

*पोमणे  हे कलिंगडाची  विक्री ते  बांधावर करत असून  प्रति वर्ष  त्यांना कलिंगडापासून ३ ते साडे तीन लाख रुपये उत्पन्न भेटते.  यावर्षी  कलिंगडामधून त्यांना खर्च वजा जाऊन ३ लाख २० हजार रुपये मिळाले. मागील वर्षी भाज्यांच्या रोपांतून ६ लाख रुपये भेटले तर ४ लाख ५० हजार ऊसाची  रोपे विक्रीकरुन ११ लाख २५ हजार रुपये मिळाले. त्यातून  खर्च वजा जाऊन त्यांना ४ लाख ५० हजार रुपयांचा नफा झाला.*  

*अजित पोमणे, शेतकरी-कृषि विभागाकडून रोपवाटिकेला आणि शेडनेटसाठी अनुदान प्राप्त झाले त्यामुळे हायटेक रोपवाटिकेची निर्मिती करु शकलो.  शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन कृषि विभागाकडून मिळू लागल्याने चांगल्या दर्जाची रोपे तयार करु शकलो. 

 *वैभव तांबे, उपविभागीय कृषि अधिकारी–कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ  अजित पोमणे यांना देण्यात आला.  पोमणे हे त्यांच्या रोपवाटिकेत चांगल्या दर्जाच्या रोपांची उत्पादने घेत असल्याने  परिसरातील शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर रोपे उपलब्ध होत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test