इंदापूर , सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांच्यावर अन्याय होत आहे. सामान्य जनतेला न्याय मिळवून दिल्याशिवाय आमची लढाई संपणार नाही, त्यासाठी सरकारला जेरीस आणू, असा सूचक इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे शुक्रवारी (दि.20) इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत सभेचे आयोजन केले होते. सदर प्रसंगी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस बोलत होते.
ते पुढे म्हणाले,नृसिंह अवताराने अनाचार, अत्याचार, व्याभिचार, पथभ्रष्ट सत्ता या दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट केला. श्री लक्ष्मी-नृसिंहाने अनाचारी वृत्ती, अत्याचार वृत्ती विरोधात लढण्याची ताकद द्यावी, असे आशीर्वाद मी व हर्षवर्धन पाटील यांनी घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मी लहानपणापासून येथे दर्शनासाठी येत आहे. माझी आजी सांगायची आहे की नदी पार करून होडीने नरसिंहपुरला दर्शनाला जायचो. सन 1997 ला मी महापौर झाल्यानंतर येथे दर्शनाला आल्यानंतर विकासाची इच्छा मनात आली. लक्ष्मी-नृसिंहाने आशिर्वाद दिला व 2014 ला मुख्यमंत्री झालो. त्यामुळे मी मंजूर केलेला श्री लक्ष्मी-नृसिंह तिर्थस्थळ विकासाचा रु.264 कोटी रुपयांचा आराखडा सध्या पूर्णत्वास येत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे देवेंद्र फडणवीस नमूद केले.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते शंकररावजी पाटील यांचे पासून कोणतीही निवडणूक असो अथवा विकास काम असो येथील लक्ष्मी-नृसिंहाचा आशीर्वाद घेऊनच आम्ही शुभारंभ करतो. इंदापूर तालुक्यातील जनता भाजप वर प्रेम करणारी आहे. देवेंद्र फडणवीस व भाजपने आदेश द्यावा, इंदापूर तालुक्यातील जनता आपली ताकद दाखवून देईल. राज्यात जनतेची विकासकामात अडवणूक होत आहे, ती दूर करण्यासाठी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत, असे साकडे लक्ष्मी-नृसिंहाकडे घातल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात नमूद केले.
यावेळी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. राहुल कुल, आ. राम सातपुते, पृथ्वीराज जाचक, रंजनकाका तावरे, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, अंकिता पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, हनुमंतराव सूळ व इंदापूर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार भाजपाचे इंदापूर तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी मानले. सभेला प्रचंड गर्दी झाली होती.