'फोर्ब्स'ने गौरविलेल्या आर्या तावरेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले कौतुक
मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित 'फोर्ब्स' मासिकाने गौरविलेली आणि मूळची बारामतीकर असणारी लंडनस्थित युवा उद्योजक आर्या तावरेनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतील त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्याच्या नवीन स्टार्टअपची माहिती घेत तिचे कौतुक केले.
मुळची बारामतीची असणारी आणि सध्या लंडनमध्ये राहणाऱ्या आर्या तावरेने अवघ्या बावीसव्या वर्षी 'फ्युचरब्रिक्स' नावाने 'स्टार्टअप' सुरू करून ब्रिटनमधील लघू व मध्यम बांधकाम व्यावसायिकांना निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. अनेक मोठ्या वित्तपुरवठा कंपन्या तिच्या कंपनीशी जोडल्या गेल्या आहेत. तिच्या या कामगिरीची दखल 'फोर्ब्स' मासिकाने घेतली आहे. युरोपमधील वित्तपुरवठा वर्गवारीतील तीस वर्षांखालील पहिल्या तीस व्यक्तींच्या यादीत आर्याचा समावेश करण्यात आला आहे. 'फोर्ब्स' मासिकातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आर्याच्या रूपाने मराठी मुलीचा समावेश झाला आहे. तिच्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर माहिती घेत तिची आस्थेवाईकपणे चौकशी केली, तिच्या कामाचे कौतुक केले.
'फोर्ब्स'च्या यादीत समाविष्ट झालेल्या युवा उद्योजक आर्या तावरेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या मुंबई येथील देवगिरी या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.