पुणे जिल्ह्यात ८ लाख मालमत्तांवर महिलांचे नाव ...!
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पुणे जिल्हा परिषदेने महिलांना मालमत्तेचा अधिकार देण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील ८ लाख १५ हजार अर्थात ८८ टक्के मालमत्तांवर महिलांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.
मालमत्तेचा आणि त्याच्या मालकांचा तपशील ग्रामपंचायती ठेवतात. जागतिक स्तरावर, महिलांकडे २० टक्क्यापेक्षा कमी मालमत्तेची मालकी आहे. गतवर्षी स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत क्षेत्रात विशेष महाफेरफार अभियान राबविण्यास सुरूवात करण्यात आली. मोहीमेची सुरूवात करताना पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांकडे १६ टक्के मालमत्ता होती.
मालमत्तेच्या मालकीचा अभावामुळे महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य, तसेच अधिकारांचा वापर करण्याच्या क्षमतेला मर्यादा येतात. महिलांच्या सक्षमीकरणाचा उपाय म्हणून सर्व ग्रामपंचायतींना मालमत्तेचे सध्याचे मालक आणि लाभार्थी महिलांकडून मालकी तपशीलात फेरफार करण्यासाठी संयुक्त अर्ज मागवण्याच्या सूचना देण्यात आल्या. या संकल्पनेला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्यातील सुमारे सव्वा दोन लाख महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. फेरफार मोहिम सुनियोजितपणे पुढे नेण्यासाठी या महिलांना सहभागी करण्यात आले. गावात बैठका, मेळावे, वैयक्तिक भेटीच्या माध्यमातून प्रबोधनावरही भर देण्यात आला. या उपक्रमाला सामाजिक चळवळीचे स्वरुप देण्यात जिल्हा परिषद व्यवस्थापनाला यश आहे. सरपंच-ग्रामसेवकांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी या उपक्रमात योगदान दिले.
यावर्षी महिला दिनापर्यंत ६ लाख ४२ हजार मालमत्ता घरातील महिला सदस्यांच्या मालकीच्या होत्या. स्वामीत्व योजनेदरम्यान काढलेल्या मालमत्तेचे स्पष्ट नकाशे असलेले अद्ययावत मालमत्ता कार्ड वितरित करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. प्रॉपर्टी कार्ड्सच्या वितरणामुळे या कामाला गती मिळाली आणि अधिकाधिक कुटुंबांनी महिलांचे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला.
आता ही संख्या आठ लाखापेक्षा अधिक मालमत्तांवर पोहोचली आहे, जी ग्रामीण भागातील मालमत्तांपैकी ८८ टक्के आहे. प्रॉपर्टी कार्डवर कर्ज मिळू शकते आणि घरातील स्त्रीच्या संमतीशिवाय घरातील पुरुष सदस्य कर्ज घेऊ शकत नाहीत. एकप्रकारे महिलांना या माध्यमातून घरातील महत्वाच्या निर्णयात सहभागी होण्याचा आणि पर्यायाने सन्मानाचे जीवन जगण्याचा अधिकार मिळाला आहे.
आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पुणे-महिलांना सन्मान देण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि दैनंदीन जीवनातही त्यांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली आहे. नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. महिला सक्षमीकरणासाठी हे महत्वाचे पाऊल ठरावे.*
लीना दळवी, काटेवाडी, ता.बारामती- महिलांच्या नावावर मिळकत असणे ही काळाची गरज आहे. यामुळे महिलांचे सक्षमीकरण होऊन महिलांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी मदत होते. महिलांची मानहानी टाळली जाण्यासाठी मदत होते. मिळकत माझ्या नावावर झाल्याने मला खूप समाधान वाटत आहे. हे घर माझे आहे ही समाधानाची भावना माझ्या मनात राहील.
स्नेहा अविनाश थोरात, पिंपळी, ता. बारामती-महिलांच्या नावावर मिळकत असणे खूप चांगले आहे. आज मला माझ्या हक्काचे घर मिळले आहे. महिलांच्या मनात यामुळे सुरक्षिततेची भावना असते. माझ्या घरातील सदस्यांनी स्वखुशीने माझ्या नावावर घर केले आहे.