बारामती :- बारामती तालुक्यातील विविध विभागांची कामकाज आढावा बैठक उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती येथील सभागृहात सोमवारी सायंकाळी पार पडली.
बैठकीस तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे, उप अधिक्षक भूमी अभिलेख गणेश कराड व विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी श्री. कांबळे यांनी बारामती येथील विविध विभागांतर्गत सुरु असलेल्या विकास कामांची सादरीकरणाद्वारे माहिती घेतली. विकास कामावर चर्चा करून श्री. कांबळे म्हणाले, सर्व विभागणी त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा. विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी खास प्रयत्न करावेत. निधीची मागणी असल्यास प्रस्ताव सादर करावेत. सर्व विभागांनी समन्वयांनी कामे करणे आवश्यक आहे. बारामती तालुक्यात प्रशासकीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा अधिकाऱ्यांनी करावे. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करावा, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.