बारामती ! कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार पदविका अभ्यासक्रमाच्या चौथ्या बॅचचा शुभारंभ.
बारामती - पुढील काळात औषध ,खत दुकानाचा परवाना फक्त कृषी पदविकाधारक, पदवीधारक किंवा पदवीसाठी रसायनशास्त्र विषय असणाऱ्यांनाच मिळणार आहे . जुन्या दुकानदारांकडे कृषी ची पदवी किंवा पदविका नसेल तर त्यासाठी मॅनेज हैदराबाद ,बारामती, नागपूर तर्फे एक वर्षाचा देशी पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे .असे मत उपविभागीय कृषी अधिकारी बारामती वैभव तांबे यांनी व्यक्त केले . ते या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते या यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख डॉ. धीरज शिंदे ,विषय विशेषज्ञ डॉ. जाधव, संतोष गोडसे होते. ते पुढे म्हणाले की कीटकनाशके ,खते ,औषधे यांचं कायद्यानुसार काम चालते. त्यासाठी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार त्याचा वापर करणे गरजेचे आहे . ज्या गावातील दुकानातील तक्रारी येतात त्या ठिकाणी इन्स्पेक्शन करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी, उपविभाग उपविभागीय कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी तपासणी करतात व त्यातील त्रुटी नुसार त्यांचा अहवाल सादर करतात .दुकानदारांनी त्यांचे परवाने संपण्याच्या अगोदर एक महिना नूतनीकरणासाठी पाठवावा. आपल्या दुकानाचे योग्य रेकॉर्ड ठेवावे आणि दुकानात भाव फलक, साठा फलक व पॉस मशीन मधील साठा दुकानातील साठा जुळला पाहिजे. आपण खरेदी करत असल्याने निविष्ठा यांचे कंपनीचे ‘ओ’ फार्म ठेवावेत. दर महिन्याला खत, औषधे, बियाणे बाबत जिल्हा अधीक्षकांना मासिक रिपोर्ट पाठवावा.कृषि दुकानदारांनी ड्रोनद्वारे औषध, खत फवारणी साठी ही पुढाकार घ्यावा.
केंद्रप्रमुख डॉ. शिंदे म्हणाले काही वर्षापूर्वी यवतमाळमध्ये फवारणी वेळी अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला ते आजारी पडले. त्यासाठी ची फवारणी वेळी योग्य काळजी कशी घ्यावी,औषधाचे प्रमाण किती वापरावे इ. अभाव दिसला त्यामुळे हा कोर्स सुरू केला आहे. आठवड्यातून फक्त एक दिवसच यायचा आहे त्याचा आनंद घ्या. पंजाबमध्ये कॅन्सर प्रमाण अधिक आहे कारण तिथे औषधे आणि खतांचा बेसुमार वापर होत आहे. आपण शेतकऱ्यांना चांगला सल्ला द्या जास्तीत जास्त शेतकरी आपणाकडे येतील.
डॉ. रतन जाधव म्हणाले दुकानदारांचे लायसन नूतनीकरण करता यावे यासाठी हा कोर्स आहे. तसेच दुकानदारांना पिकांची शास्त्रीय माहिती, खते औषधांचा वापर, नवीन संशोधन इत्यादी माहिती होणार आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी या कोर्सचा उपयोग करा. या केंद्रामध्ये सर्व प्रकारचे ज्ञान आपल्याला मिळेल त्याचा उपयोग आपल्या दुकानासाठी करावा असं त्यांनी सांगितले.
संतोष गोडसे यांनी कोर्स मध्ये एक वर्षात होणाऱ्या अभ्यासक्रमाचची माहिती दिली तसेच सुनील शिरसीकर यांनी प्रास्ताविक केले तर गणेश शिंदे यांनी आभार मानले.