गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्याचे उद्घाटन
पुणे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शिरूर तालुक्यात करंदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांचे उद्घाटन करण्यात आले. शिरूर तालुक्यातील गावातील विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही श्री. वळसे पाटील यांनी यावेळी दिली.
श्री.वळसे पाटील यांच्या हस्ते शिरूर तालुक्यातील विविध गावांत विकासकामांची उद्घाटने करण्यात आली. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, सरपंच सुभद्रा ढोकले, उपसरपंच बबन ढोकले आदी उपस्थित होते.
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील गावांमध्ये बंधाऱ्याची कामे गतीने हाती घेण्यात येतील. नवीन बंधाऱ्यांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. धामारी गावातील सभामंडपासाठीही आर्थिक तरतूद करण्यात आली असून विविध विकास कामांसाठीही निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवत शासनाचे काम सुरू आहे. आपल्या गावचा सर्वांगिण विकास झाला पाहीजे, यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. गावातील विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचेही ते म्हणाले.