पुणे ! पुणे रेल्वे स्थानकवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ.
प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ रिकामे केले.
पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. खबरदारी म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे.शिवाय बॉम्ब शोधक नाशक पथक रेल्वे स्थानकात दाखल झालं असून संबंधित वस्तूची तपासणी केली जात आहे. इतकंच नाही तर काही काळासाठी रेल्वे वाहतूकही थांबवण्यात आली होती. ही वस्तू नेमकी काय आहे याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही.
बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने रेल्वे स्टेशनवर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी लगेचच प्रवाशांना स्थानक रिकामं करण्याची सूचना दिली. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर जाण्यासाठी सध्या कोणालाही परवानगी नाही. ही वस्तू इथे कशी आली, कोणी आणली या संदर्भात चौकशी सुरु आहे. अद्याप या वस्तूची स्पष्टता होऊ शकलेली नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून स्थानकात उपस्थित असलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे.
पुणे रेल्वे स्थानक परिसरात बॉम्बसदृश वस्तू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉड पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे. पुणे स्टेशनवर येणाऱ्या गाड्यांना यार्डमध्ये थांबवण्यात आलं आहे. संपूर्ण परिसरात पोलीस आणि बॉम्बशोधक पथक दिसत आहे. परिसरात तणावाचं वातावरण आहे.यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता रेल्वे स्थानकात दाखल झाले असून त्यांनी परिसराची पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, "आज सकाळी साडेदहा वाजता रेल्वे पोलीस स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राथमिक माहितीनुसार संबंधित वस्तू जिलेटीन नसल्याचं समोर आलं आहे. पुढील तपास करत आहोत. पॅनिक होण्याची गरज नाही."चार ते पाच दिवसांपूर्वी पुणे नियंत्रण कक्षात निनावी कॉल आला होता, ज्यात पुणे रेल्वे परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. तपास केला असता तो फेक कॉल असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आज पुणे रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू आढळली आहे.