शाश्वत विकास ध्येय संकल्पना प्रभावीपणे राबवा-अर्थ व सांख्यिकी संचालक विजय आहेर
यशदामध्ये शाश्वत विकास ध्येयासंबधी विभागीय कार्यशाळा
पुणे : शाश्वत विकास प्रक्रियेत कोणीही वंचित राहणार नाही. त्यामुळे शाश्वत विकास ध्येयाच्या या संकल्पनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत अर्थ व सांख्यिकी संचालक विजय आहेर यांनी व्यक्त केले.
यशदा येथे शाश्वत विकास अंमलबजावणी व समन्वय केंद्र आणि अर्थ व सांखिकी संचालनालय, नियोजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे व कोकण विभागीय "शाश्वत विकास ध्येयासंबधी विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर संचालक डॉ जितेंद्र चौधरी, पुणे विभागाचे नियोजन उप आयुक्त संजय कोलगणे, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे सहसंचालक हणमंत माळी, ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते आदी उपस्थित होते.
श्री. आहेर म्हणाले, शाश्वत विकास हा सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आणि शांतता या चार स्तंभावर आधारित आहे. संयुक्त राष्ट्र संघाने गेल्या दोन वर्षांमध्ये चर्चा करून शाश्वत विकास ध्येय निश्चित केली आहेत. २५ सप्टेंबर, २०१५ रोजीच्या सर्वसाधारण सभेत शाश्वत विकास २०३० चा मसुदा स्वीकारण्यात आला असून या विकास प्रक्रियेत कोणीही वंचित राहणार नाही अशी या ध्येयाची संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.
शाश्वत विकास ध्येयाअंतर्ग निश्चित केलेल्या निर्देशकांचे नियमित संकलन व सनियंत्रणासाठी राज्य पातळीवर नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात शाश्वत विकास ध्येय- अंमलबजावणी व समन्वय केंद्र हा कक्ष 2020 मध्येच स्थापन करण्यात आला आहे. राज्य शसनाने राज्यांच्या सर्व विभागांच्या संमतीने व शासनाच्या मान्यतेने शाश्वत विकास ध्येयांवर आधारित राज्याचे व्हिजन-2030 तयार केले असल्याची माहितीही आहेर यांनी दिली.
कार्यशाळेत तीन दिवस विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये दारिद्र्य निर्मूलन, गुणवत्तापूर्ण शिक्षण,विवेकी उपभोग आणि उत्पादन, हवामान बदलाबाबत, जमीनीवरील जीवन, उपासमारीचे समूळ उच्चाटन, चांगले आरोग्य व क्षेमकुशलता, लिंग समानता, शुदध पाणी आणि स्वच्छता व पाण्याखालील जीवन अशा विविध विषयांचा समावेश आहे.
निर्देशांक आराखड्यातील निर्देशकांची माहिती संबंधितांना व्हावी व त्यांच्याकडून या अनुषंगाने उपलब्ध माहितीचा अंदाज यावा या करीता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या समारोपावेळी झालेल्या सत्रात परवडण्याजोगी आणि स्वच्छ ऊर्जा, चांगल्या दर्जाचे काम आणि आर्थिक वाढ, उद्योग नाविन्यपूर्णता आणि पायाभूत सुविधा, शाश्वत शहरे आणि समुदाय शांतता, न्याय आणि सशक्त संस्था या विषयावर पीपीटीद्वारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यशदा उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही मार्गदर्शन केले. पुणे विभागाचे नियोजन उप आयुक्त संजय कोलगणे यांनी संयोजन केले. यावेळी पुणे व कोकण विभागातील सर्व सांख्यिकीय अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी व पुणे व पिंपरी चिंचवड मनपाचे अधिकारी तसेच इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.