ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
पंडितजींनी ‘संतूर’सारख्या काश्मिरी लोकवाद्याला
भारतीय संगीतात मानाचं स्थान मिळवून दिलं...
मुंबई, दि. 10 :- ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मांच्या ‘संतूर’वादनानं कोट्यवधी संगीतरसिकांना स्वर्गीय आनंदाची अनुभूती दिली. पंडितजींनी ‘संतूर’सारख्या काश्मिरी लोकवाद्याला भारतीय संगीतात मान मिळवून दिला. त्यांच्या ‘संतूर’वादनानं भारतीय संगीतविश्व खऱ्या अर्थानं समृद्ध झालं. पंडितजींच्या ‘संतूर’ सूरांशिवाय भारतीय संगीत अपूर्ण आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
पंडित शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनानं भारतीय अभिजात संगीताला नवी ओळख, जागतिक लोकप्रियता मिळवून दिली. पंडित हरीप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन आणि पंडित शिवकुमार शर्मांच्या संतूरवादनाची जुगलबंदी हा भारतीय संगीतातला अनमोल ठेवा आहे. पंडितजींचं निधन ही भारतीय संगीतक्षेत्राची मोठी हानी असून, पंडीतजी आणि त्यांचं संतूरवादन भारतीय संगीतात अजरामर आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.