माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रदर्शनाद्वारे शासनाच्या योजनांची उत्कृष्ट मांडणी
पुणे, दि.४:माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पुणे विभागीय प्रदर्शनाच्या माध्यमातून शासकीय योजनांची उत्कृष्ट प्रकारे मांडणी करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी आज प्रदर्शनाला भेट दिली. त्यांनी प्रदर्शनाची मांडणी आणि प्रदर्शित महितीबद्दल जाणून घेतले. माहिती अत्यंत आकर्षक आणि सोप्या पद्धतीने मांडण्यात आली असून नागरिकांना त्यामुळे योजना सहजतेने समजतील असे मत त्यांनी व्यक्त केले.
कोरोना असतानाही शासनाच्या विविध विभागांनी गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. या योजना व कामांचा आढावा उत्कृष्टपणे मांडण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी दिलेली भेट याचे द्योतक आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी यावेळी ३६० अंश सेल्फी घेतली.
*नागरिकांचा चांगला प्रतिसाद*
जिल्ह्याच्या विविध भागातील नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू पूर्वा दीक्षित हीने प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात विकासाच्या दिशेने उचलेली पाऊले आणि शासनाने विविध विभागांना आर्थिक पाठबळ देण्याचे केलेले काम याची माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.
यासोबतच कला, क्रीडा व विविध क्षेत्रातील व्यक्तीनी प्रदर्शनाला भेट दिली व माहिती जाणून घेतली.
कोरोना संकट काळातही सरकारने चांगले काम केले, गरीब, निराधार व वंचित घटकांसाठी अनेक चांगल्या योजनांच्या माध्यमातून आधार दिला. सरकारने दोन वर्षात सर्व घटकांचा विचार करून शासकीय योजनांची अंमलबजावणी केली आहे. शासनाची ही सर्व ठळक कामगिरी या प्रदर्शनातुन दिसून येत असल्याची प्रतिक्रिया अनेक सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली.