मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही साधला संवाद
पुणे : 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिमला, हिमाचल प्रदेश येथून केंद्र पुरस्कृत योजनांच्या निवडक लाभार्थ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातील १५ जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधत विचारपूस केली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात या ऑनलाईन कार्यक्रमासाठी उपस्थित लाभार्थ्यांना प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमासाठी खासदार गिरीश बापट, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) प्रकल्प संचालक शालिनी कडू आदींसह जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील केंद्रपुरस्कृत योजनांचे सुमारे पाचशे लाभार्थी तसेच माजी सैनिक उपस्थित होते.
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त हा चांगला कार्यक्रम होत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, आपण राबवत असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्यादृष्टीने त्यातील अंमलबजावणीच्या त्रुटी लक्षात येऊन त्या दूर करण्यासाठी हा लाभार्थी संवाद कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेमध्ये चांगले काम झाले असून १५ हजार पेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. यापैकी स्वत:ची जागा नसलेल्या १ हजार ५०० लाभार्थ्यांना शासनाची जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा ५ लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला असून ७११ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.
डॉ. देशमुख पुढे म्हणाले, जिल्ह्यात मुद्रा योजनेंतर्गत छोट-मोठ्या व्यवसायांसाठी १३ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. देश विकास, समाज विकासाचे साधन म्हणून आपण शासनाच्या योजनांकडे पाहिले पाहिजे. या योजना योग्य पद्धतीने राबवण्यासह निधी अखर्चित राहू नये यासाठी त्यातील त्रुटी दूर करण्यावर विशेष लक्ष दिले जावे. २०४७ साली जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होतील त्यावेळी सर्वसामान्य नागरिकाच्या अपेक्षा पूर्ण होत असल्याचे दिसेल यासाठी प्रयत्न व्हावेत.
खासदार श्री. बापट म्हणाले, महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी वर्ग अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न होत आहेत. योजना राबवत असताना कुठे काही कमतरता असेल तर त्याचा दोष दुसऱ्यावर न टाकता आपल्यातील दोष दूर करण्यासाठी प्रयत्न केल्यास चांगले काम होईल.
योजनांच्या लाभार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या लाभांची माहिती गावातील इतरांपर्यंत पोहोचवून त्यांनाही कसा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. योजनांची अंमलबजावणी आपल्या गावात व्हावी यासाठी एक प्रकारे कुटुंबप्रमुखाची जबाबदारी घेत गावात १०० टक्के योजना राबवण्यासाठी प्रयत्न करेन असा सकंल्प करावा, असेही श्री. बापट म्हणाले.
आयुष प्रसाद यांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये जिल्ह्याने चांगले यश मिळवल्याचे सांगून जागा नसलेल्या लाभार्थींना घरकुलासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात जिल्हाधिकारी आणि महसूल प्रशासनाने चांगली मदत केल्याचे सांगितले. त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी), प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण व शहरी), जल जीवन मिशन व 'अमृत' अभियान, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर, प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंमलबजावणीबाबत उपस्थितांना माहिती दिली.