सोमवारी पुणे विभागीय खरीप हंगाम बैठकीचे आयोजन
पुणे : पुणे महसूल विभागांतर्गत सर्व जिल्ह्यांच्या खरीप हंगाम २०२२ नियोजनाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी १६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन कारण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात होणाऱ्या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे तसेच विभागातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत खरीप हंगामात खते, बियाणे, कृषि निविष्ठांची आवश्यकता, मागणी, आवंटन व उपलब्धता तसेच पिक कर्ज, वीज वितरण, विस्तार मोहिमा आणि सिंचन सद्यस्थिती याबाबतचा आढावा घेतला जाणार आहे.
ऑनलाईन महाडीबीटी प्राप्त अर्ज, प्रत्यक्ष लाभ, गावनिहाय बैठका, कृषि प्रक्रीया योजना, विकेल ते पिकेल अभियान, कृषि विभागाच्या योजनांची अंमलबजावणी, जमिन सुपिकता निर्देशांक वापर, पिक स्पर्धा आयोजन, ऊस पाचट कुजविणे, हुमणी किड नियंत्रण, विस्तार मोहिमा, मग्रारोहयो फळबाग लागवड तसेच ग्राम कृषि विकास समितीचादेखील आढावा घेण्यात येणार आहे. खरीप हंगामच्या यशस्वीतेसाठी लोकप्रतिनिधींच्या सुचनांचा अंतर्भाव करुन सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे.
बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे विभागीय कृषि सहसंचालक यांनी कळविले आहे.