विधवा भगिनींबाबत दुजाभाव विरोधी चळवळीचा हेतू महिलांच्या सन्मान भावनेचा!: डॉ. नीलम गोऱ्हे
समाजाने एकजुटीने पाठीशी उभे राहण्याचे राज्यस्तरीय परिवर्तन बैठकीत आवाहन
पुण : शहरी आणि ग्रामीण भागातील विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रथम जनजागृती होऊन अधिकाधिक प्रमाणात या महिलांचा विकास आणि पुनर्वसन व्हावे, यासाठी सामाजिक संस्था, प्रशासन आणि समाजाने एकत्रितरित्या पुढे यावे असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.
विधान भवन पुणे येथे विधान परिषद उपसभापती कार्यालय, स्त्री आधार केंद्र, विधवा महिला सन्मान कायदा अभियान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक संस्थांसोबत आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन बैठकीत त्या बोलत होत्या.
श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व घटकांचा विकास होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम समाजाच्या विकासासाठी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करण्याच्या केलेल्या ठरावाबद्दल त्यांचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे. याविषयी नुकतेच ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रक काढले असून या सामाजिक कार्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे आहे.
महिला आणि त्यांचे सामाजिक प्रश्न यावर काम होणे आवश्यक आहे. समाजाने यासाठी आपली मानसिकता आणि दृष्टिकोन यामध्ये बदलणे गरजेचे आहे. विवाह हा संस्कार असून तो समानतेवर टिकतो. समाजामध्ये महिलांना दूजाभावाने वागवू नये व विधवांच्या प्रती असणाऱ्या अनिष्ट रूढी व परंपरा नष्ट होण्यासाठी समाजामध्ये जनजागृती होणे गरजेची आहे, असे त्यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी 'पुणे जिल्ह्यात ग्राम पंचायत हद्दीतील मालमत्तेवर पुरुषाबरोबर त्याच्या पत्नीचे नावही घेण्याबाबत जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्याचे सांगितले. ८८ टक्के घर पत्रकावर दोघांचीही नावे असल्याची माहिती त्यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते आणि या अभियानाचे प्रवर्तक प्रमोद झिंजाडे यांनी यामागील भूमिका स्पष्ट केली. स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी उपस्थित महिलांमध्ये दोन गटचर्चा घेण्यात आल्या. यामध्ये अनेक महिलांनी स्वतःचे अनुभव कथन करून या प्रथेचा झालेला त्रास सांगितला व समाजाची मानसिकता बदलण्यासाठी ग्रामीण स्तरावर उपाययोजना गरजेची असल्याचे मत व्यक्त केले. समाजामध्ये असलेला विधवेप्रती असणारा दृष्टिकोन, त्यांना येणारे विविध अनुभव आणि या विषयात भविष्यात करावयाच्या कामाचे नियोजन याविषयी बैठकीत चर्चा झाली. स्त्री आधार केंद्राच्या सुनीता मोरे, विजया शिंदे, अनिता शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीला पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, विविध तालुक्यांचे गटविकास अधिकारी, स्त्री आधार केंद्राच्या अनिता शिंदे, विभावरी कांबळे, रमेश शेलार, गौतम गालफाडे, लहानु अबनावे, अनिता परदेशी, आश्लेषा खंडागळे, वैशाली घोरपडे आदी उपस्थित होते. बैठकीला अहमदनगर, सातारा, सांगली, लातूर, सोलापूर, मुंबई, नवी मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणांवरून सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन उपसभापती कार्यालयाचे सचिव रवींद्र खेबुडकर यांनी केले.