पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका
पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. खाजगी चारचाकी वाहनांसाठी आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
खाजगी चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरून हवे असतील त्यांनी 23 मे रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 02.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात धनाकर्ष (डीडी) पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 24 मे रोजी सकाळी 10.30 वाजता कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल. अर्जासाठी त्याच दिवशी दुपारी 04.30 वाजता सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या दालनात लिलाव करण्यात येणार आहे.
ज्या दुचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी 24 मे रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 02.30 दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात जमा करावेत. यामध्ये एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 25 मे रोजी सकाळी 10.30 वाजता कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल. अर्जासाठी त्याच दिवशी दुपारी 04.30 वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येणार आहे.
धनाकर्ष (डीडी) आरटीओ पुणे यांच्या नावे राष्ट्रीय, शेड्युल्ड बँकेचा पुणे येथील असावा. धनाकर्ष दोन महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा. डीडीसोबत अर्जदाराने पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य आहे. तिलावासाठी जमा करण्यात येणारा धनाकर्ष (फक्त एकच डीडी) हा सीलबंद पाकीटात जमा करावा. पुणे आरटीओ या नावाने सादर केलेले तसेच विहित शुल्कापेक्षा कमी रक्कमेचे धनाकर्षही बाद केले जातील.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.