Type Here to Get Search Results !

बारामती ! ऊस खोडवा उत्पादन व पाचट व्यवस्थापन अभियान

बारामती ! ऊस खोडवा उत्पादन व पाचट व्यवस्थापन अभियान
बारामती - ऊस हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पिक आहे. राज्यात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणत करण्यात येते. ऊसतोडणीनंतर पाचट जाळण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल असल्याचे आतापर्यंतच्या अनुभवावरून दिसून आलेले आहे. शेतकऱ्यांना पाचटाचे महत्व पटवून देण्यासाठी कृषि विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी व साखर कारखाने यांचे संयुक्त विद्यमाने चालू वर्षी 'ऊस खोडवा उत्पादन व पाचट व्यवस्थापन अभियान' राबविण्यात आले. बारामती उपविभागात उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यात आली.

बारामती उपविभागातील बारामती, दौड, इंदापूर व पुरंदर  या चार तालुक्यातील कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी तसेच चार तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात येणारे 9 सहकारी व खाजगी कारखाने यांची मागील वर्षी 30 ऑक्टोबर रोजी माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज येथे कार्यशाळा घेण्यात आली. या माध्यमातून ऊस पाचट व्यवस्थापनाचे तांत्रिक ज्ञान उत्तमरीतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले.

ऊस खोडवा उत्पादन व पाचट व्यवस्थापन अभियान अंतर्गत सप्ताहाचे 15 ते 22 नोव्हेंबर 2021 या कालावधीत  चार  तालुक्यातील गावांमध्ये कृषी विभाग व साखर कारखाने यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात  आले. गावागावामध्ये शेतकऱ्यांचा मेळावे आयोजित करण्यात आले व यामध्ये पाचट व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यानंतर प्रत्यक्ष ऊस तुटून गेलेल्या शेतावर पाचट व्यवस्थापनाची प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आली. उसाचे पाचट जाळू नये, याबाबत शेतकऱ्यांना शेतावरच कृषी विभागामार्फत शपथ देण्यात आली. 

शेतकऱ्यांमध्ये अभियानाबाबत जागृती आणण्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग प्रभाविपणे करण्यात आला. कृषि विभागाच्या आत्मा योजनेतर्गत पाचट कुजविणारे जिवाणू  शेतकऱ्यांना देण्यात आले.                   कृषि यांत्रिकीकरण योजनेतून पाचट कुट्टी यंत्र मल्चर यासाठी मोठया प्रमाणात अनुदान देण्यात आले. याचा शेतकरी बांधवांना चांगला फायदा झाला. 

कृषी सहायक यांच्यामार्फत पाचट व्यवस्थापन प्रशिक्षण वर्गाचे साखर कारखान्याशी समन्वय साधून गाव नियोजन करणे ही जबाबदारी तालुका कृषी अधिकारी यांनी पार पाडली. सर्व मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व  कृषि सहाय्यक यांनी गावागावामध्ये प्रशिक्षण वर्ग आयोजित केले. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी प्रत्येक साखर कारखान्यांना दिलेल्या आराखड्याप्रमाणे साखर कारखान्यांनीदेखील शेतकरी मेळावे घेण्यासाठी मोठी मदत केली.
बारामती कृषि उपविभागीतील 4 तालुक्यातील ऊस उत्पादन घेत असलेल्या सर्व गावांमध्ये  381 प्रशिक्षण, 4 हजार 115 ऊस  पाचट कुजविण्याची प्रात्यक्षिके, 529 कोपरा सभा घेण्यात आल्या.  त्याचा दृष्य परीणाम म्हणजे आजपर्यंत 12 हजार 320 शेतक-यांनी 9 हजार 660 हेक्टर क्षेत्रावर ऊस खोडवा उत्पादन व पाचट व्यवस्थापन अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. 

उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे –शेतकरी बांधवांना या अभियानाचा चांगला फायदा झाला आणि भविष्यातही होईल. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे ऊसाचे पाचट जाळल्यामुळे होणारे प्रदुषण व कार्बन उत्सर्जन यावर संशोधन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे भविष्यात कृषि विभागाचा पाचट व्यवस्थापनाचा   ‘बारामती पॅटर्न’ संपूर्ण राज्याला मार्गदर्शक ठरणार आहे.

बारामती कृषि  उपविभागात बारामती, दौंड, इंदापूर व पुरंदर या चार तालुक्यांचा समावेश आहे. ऊसाचे हंगामनिहाय क्षेत्र आडसाली  36 हजार 797  हेक्टर, पुर्वहंगामी 11 हजार 768  हेक्टर,  सूरु  10 हजार 875  हेक्टर व खोडवा 23 हजार 836 हेक्टर असे एकूण 83 हजार 276 हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली आहे. खोडवा ऊस पिकाचे क्षेत्र एकूण क्षेत्राच्या जवळपास 28 टक्के आहे. ऊसाची सरासरी प्रति हेक्टरी उत्पादकता आडसाली 118.50 टन. पूर्व हंगामी 100.88 टन,सुरू 89 टन व खोडवा 74.19 टन प्रति हेक्टर इतकी आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test