इंदापूर - सध्या शहापाटी ते शहागावठाण दरम्यान असलेल्या मेन रोडचे डांबरीकरणाचे काम चालू आहे. सदरचे काम अतिशय संथ गतीने होत आहे तसेच कामाच्या दर्जा बाबतीतही मला शंका येत आहे.
सदरच्या कामाचे इस्टीमेट उपलब्ध झाले नसल्याने ठामपणे मला त्यावर आक्षेप घेता आला नाही. परंतु, जवळ जवळ एक महिना झाला जुना रस्ता उकरून काढला आहे. तद्नंतर त्या रस्त्यावर खडी बऱ्याच दिवसांनी टाकण्यात आली. सदरची खडी काही ठिकाणी टाकली आहे तर काही ठिकाणी टाकली नाही. खडी टाकून एकदा चोपले नंतर अनेक दिवस काम बंद राहीले. परिणामी, रस्त्यावरून वाहतूक झाल्यावर ती खडी उखडली गेली तसेच काही ठिकाणी खडी खाली दबून चाकोरी पडली. खडीच्या लेयर ची जाडी कमी जास्त दिसत आहे. 3 ते 4 दिवसापासून खडीवर मुरुम टाकण्यात येत आहे, मुरूम अतिशय कमी प्रमाणात वापरण्यात येत आहे. कुठे कुठे तर मुरुमच टाकला गेला नाही. ही परिस्थिती माझ्या लक्षात आल्यानंतर त्या बाबत देखरेख करणारे मा. परिमल कांबळे साहेब यांना विचारना केल्यावर 'साहेबांनीच आम्हाला कमी मुरूम वापरण्यास सांगितले आहे, जेणेकरून खडीचा दुसरा लेयर टाकल्यावर दोन्ही लेयर चांगल्या मिक्स होतील. पीडब्ल्यूडी ची कामे दर्जेदारच असतात. जर तुम्हाला कामात काय चुकीचे वाटत असेल तर आम्हाला त्वरित संपर्क साधावा'. असे सांगण्यात आले. परंतु त्यांच्या त्या बोलण्याने माझे समाधान झाले नाही.
सदरचे काम लवकरात लवकर व दर्जेदार व्हावे, सदरचा रस्ता शहा ग्रामस्थांसाठी एकमेव रस्ता असल्याने ग्रामस्थांना अंथरलेल्या खडीवरूनच गाड्या चालवाव्या लागत आहेत. खडीवरून दोनचाकी गाड्या घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी दि. 11 मे रोजी उपकार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर यांना लेखी निवेदन दिले आहे. तसेच इस्टीमेटची ही मागणी केली आहे.हे काम दर्जेदार व जलदगतीने करण्यात आले नाही तर संबंधितांच्या विरोधात वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा बहुजन मुक्ती पार्टी चे कार्यकर्ते सुरज यांनी दिला आहे.