राज्यामध्ये गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी बायोमेट्रिक (AMBIS) प्रणाली कार्यान्वित
पुणे , 'ऑटोमोटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम' (AMBIS) या संगणकीय प्रणालीचे उदघाटन 13मे रोजी गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांच्या हस्ते राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, मुख्यालय, महाराष्ट्र राज्य,पुणे येथे करण्यात आले.
कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक (पश्चिम) सुरेश मेखला, पोलीस उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पिपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक ए.डी. शिंदे, श्री.देशपांडे उपस्थित होते.
एएमबीआयएस प्रणाली ही प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असून पोलीस दलाने आधुनिकीकरणाची कास धरून केवळ बोटांचे ठसेच नाही तर तळवे चेहरा व डोळे स्कॅन करुन ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस घटकांकडून या यंत्रणेचा वापर झाल्यावर गुन्ह्यांची झटपट उकल होऊन दोषसिद्धीच्या प्रमाणात वाढ होईल असे श्री. रितेश कुमार यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी केली. यावेळी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती. पल्लवी बर्गे व इतर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी ,अंगुली मुद्रा विभागाचे वरिष्ठ तज्ञ रोहिदास कसार, प्रथम तज्ञ /पोलीस निरीक्षक अविनाश सरवीर, प्रथम तज्ञ /पोलीस निरीक्षक रुपाली गायकवाड, यांचेसह अंगुली मुद्रा केंद्रातील सर्व अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय, परिक्षेत्रीय कार्यालये ,जिल्हा कार्यालय येथील वरिष्ठ अधिकारी व गुन्हे अन्वेषण विभागाचे हे एएमबीआयएस प्रणालीचे नोडल अधिकारी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
*एएमबीआयएस प्रणाली*
पूर्वी गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशावरून आरोपीची ओळख पटवली जायची मात्र आता हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधील चेहरा व छायाचित्रावरुनही गुन्हेगारांची ओळख पटविण्यात येणार आहे. या प्रणालीत आरोपींच्या अंगुली मुद्रा पत्रिका, तळहाताचे ठसे, चेहरा व डोळ्यांची बुबुळे हे डिजीटल स्वरुपात जतन करुन ते अभिलेखाशी जुळविण्याची क्षमता आहे.
पोलीस ठाणे स्तरापर्यंत 'एएमबीआयएस' यंत्रणा राबविणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य आहे. या यंत्रणेअंतर्गत सुमारे ६.५ लाख अटक व शिक्षाप्राप्त आरोपीचा अभिलेख संगणकीकृत करण्यात आलेला आहे. एएमबीआयएस प्रणाली ही भविष्यात सीसीटीएनएस, प्रिझम, सीसीटीव्ही व राष्ट्रीय स्तरावरील एनएएफआयएस या प्रणालीशी जोडण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व पोलीस ठाणे, परिक्षेत्रीय कार्यालये, पोलीस आयुक्तालय, जिल्हा पोलीस मुख्यालय, अंगुली मुद्रा केंद्रे, प्रशिक्षण केंद्रे व मध्यवर्ती कारागृह येथे एएमबीआयएस प्रणालीचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. इंटरपोल आणि एफबीआय येथे हे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.M/s Smartchip india pvt Ltd/IDEMIA ही प्रकल्प समनव्यक कंपनी आहे.
पोलीस ठाण्यात अटक आरोपीच्या अंगुली मुद्रा पत्रिकेची ऑनलाइन नोंदणी करुन त्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा पूर्व इतिहास तपासण्यासाठी व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी या संगणकीय यंत्रणेचा उपयोग होणार आहे. एएमबीआयएस प्रणालीतंर्गत देण्यात येणा-या पोर्टेबल एएमबीआयएस या यंत्रणेचा वापर करून गुन्ह्यांच्या घटनास्थळी मिळालेल्या चान्सप्रिटद्वारे गुन्हेगारांचा शोध घेणे काही मिनिटातच शक्य झाले आहे. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात वाढ होवून राज्याच्या दोषसिध्दीच्या प्रमाणात वाढ होणार आहे.
एएमबीआयएस प्रणाली ही प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असुन यंत्रणेची गती व अचुकता यामुळे तो इतर प्रणालीपासून वेगळी ठरली आहे. महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी एएमबीआयएस यंत्रणा महत्वाची भूमिका पार पडणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील परीक्षणात एएमबीआयएस प्रणालीवर सन २०२० पासून एप्रिल २०२२ पर्यंत २.१४ कोटींच्या चोरीस गेलेल्या मालमत्तेच्या ५२ केसमध्ये आरोपीचा शोध लावण्यात आला.