Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील विजेत्यांना पारितोषिके

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील विजेत्यांना पारितोषिके
लालफीत, दफ्तरदिरंगाई सारख्या शब्दांना हद्दपार करत राज्याच्या प्रगतीची गती कायम ठेवा- मुख्यमंत्री

मुंबई दि. 21. लालफीत, दफ्तरदिरंगाई या शब्दांना हद्दपार करत सर्वसामान्यांच्या सुखासाठी काम करतांना  राज्याच्या प्रगतीची “गती” कायम ठेवा असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
        मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील 18 पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, राज्यभरातील पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी, शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोविड काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून, कुटूंबापासून दूर राहून शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम केल्यामुळे या संकटाचा आपण मुकाबला  करू शकलो अशा गौरवपूर्ण शब्दात मुख्यमंत्र्यांनी याकाळात केलेल्या कामाचे कौतूक केले.  ते पुढे म्हणाले की,  जेंव्हा आपला राज्याचा लाडका मुख्यमंत्री म्हणून  उल्लेख होतो तेंव्हा त्याचे खरे श्रेय या प्रशासकीय यंत्रणेत समर्पित भावनेने काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाते. प्रशासनात काम करत असतांना अनेक अडचणी येतात, आव्हाने समोर येतात परंतू त्यातही काम करत असताना नियमांची चौकट पाळून आपण सर्वसामान्य जनतेच्या सुखासाठी किती चांगले काम करू शकतो हे लक्षात घेऊन जो काम करतो त्यातूनच चांगल्या प्रशासनाची सुरुवात होत असते.
राजकीय नेतृत्व हे राज्याच्या हिताची आणि विकासाची स्वप्नं दाखवतात परंतू ती सत्यात उतरवण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेला करावे लागते. हे करत असतांना सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातील दु:खाचे अश्रू पुसले जाऊन तिथे आनंदाचे अश्रू जेंव्हा येतात तेंव्हा प्रशासन चांगले काम करत आहे असे आपण मानतो. प्रशासन किती सुलभतेने काम करत आहे याचे उदाहरण देतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यात सुलभपणे केलेल्या कर्जमुक्तीचा उल्लेख केला. अलिकडच्या काळात जाहीर झालेल्या निरिक्षणांमध्ये ज्या राज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि ज्या राज्याच्या स्थुल राज्य उत्पन्नात चांगली वाढ होत आहे त्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याची माहिती दिली. हे सर्व प्रशासकीय यंत्रणेतील सहकाऱ्यांमुळे शक्य झाल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी आपल्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न शासन करत असून यासाठी शेती आणि शेतकरी हिताच्या अनेक महत्वाकांक्षी योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री  म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्व पारितोषिक प्राप्त अधिकारी- कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत नागरी सेवा हक्क दिनाच्या शुभेच्छा दिल्या.आपली निष्ठा, कर्तव्यभावना राज्य आणि देशाच्या विकासासाठी, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जपावी, महाराष्ट्र हे आपल्या सर्वांचे मोठे कुटूंब आहे त्याच्या सुखासाठी काम करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने केले. 




 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test