पुणे ! खाद्यतेलाच्या पुर्नवापरासाठी नियमांचे पालन आवश्यक.
पुणे, दि. १३: अन्न सुरक्षा व मानदे (अन्न व्यावसायाचे परवाना व नोंदणी) नियमन २०११, अन्न सुरक्षा व मानदे (विक्रीसाठी मनाई व निर्बंध) नियमन २०११ व अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे वेळोवेळी प्राप्त आदेशानुसार खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळणे गरजेचे आहे. तसेच अखाद्य वापरासाठी वापर करताना आवश्यक अभिलेखा जतन करणे बंधनकारक आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शि.स. देसाई यांनी दिली आहे.
विविध नियम आणि आदेशात नमूद केल्याप्रमाणे तळलेल्या खाद्यतेलाचा पुर्नवापर टाळणे आवश्यक आहे. त्याचा शक्यतो तळण्यासाठी एकदाच वापर करावा. तळलेल्या खाद्यतेलाचा पुर्नवापर करताना ट्रान्सफॅट तयार होणे टाळण्यासाठी जास्तीत जास्त ३ वेळेस वापर करावा. न वापरलेल्या तेलामध्ये १५ टक्केपेक्षा जास्त टोटल पोलर कंपाऊंड्स (टीपीसी) आढळता कामा नये. २५ टक्केपेक्षा जास्त टीपीसी आढळून आल्यास त्याचा पुर्नवापर करु नये.
५० लिटर पेक्षा जास्त खाद्यतेलाचा तळण्यासाठी वापर करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी खाद्यतेलाच्या पुर्नवापराबाबतचा अभिलेखा जतन करावा. तसेच उपयोगात आलेले खाद्यतेल अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्ली मान्यता प्राप्त संस्थेकडे देण्यात यावे व त्याबाबतचा अभिलेखा जतन करावा अशी तरतूद आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा मानदे कायदा कलम ५५,५७ व ५८ आणि भा.द.वि. कलम २७२ व २७३ नुसार कडक कारवाई करण्यात येईल.
उपयोगात आलेले अखाद्य खाद्यतेल जमा करणाऱ्या मान्यता प्राप्त संस्था किंवा प्रतिनिधींनी हे तेल बायोडिझेल, साबण, वंगण आदींचे उत्पादन करण्यासाठी वापर करावे. कोणत्याही परिस्थितीत याचा वापर खाद्यपदार्थ निर्मिती किंवा भेसळीकरीता करु नये. तसेच याबाबतचा आवश्यक तो अभिलेखा त्यांनी जतन करावा. या प्रकरणी नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास त्यांचे विरुद्ध अन्न सुरक्षा मानदे कायदा कलम ५७ आणि भा.द.वि. कलम २७२ व २७३ नुसार कडक कारवाई करण्यात येईल.
खाद्यतेलासंबंधी नियमांचे व तरतुदींचे तंतोतंत पालन करण्यात यावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले आहे.