जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवादी हल्ला प्रतिकार विषयक रंगीत तालिम संपन्न
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले सुरक्षा रक्षकाच्या कामगिरीचे कौतुक
पुणे, दि. ८: वेळ सकाळची....जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी ६ वाजून ४८ मिनीटांनी मोठा आवाज झाला.... जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील दाराकडच्या बाजूस आवाज आल्याचे लक्षात येते....पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून ६ वाजून ५५ वाजता दूरध्वनी जातो....अधूनमधून आवाज येतच असतात....कर्मचारीदेखील काहीशा भिती आणि उत्सुकतेने विचारणा करीत असतात....काहीवेळाने जिल्हाधिकारी आल्यानंतर सुरक्षा प्रात्यक्षिक यशस्वीपणे पार पडल्याचे लक्षात येते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकात अतिरेकी आत असल्याची शंका असल्याने राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, बॉम्बशोधक पथक, राज्य राखीव दल, जलद प्रतिसाद दल, सुरक्षा दल यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाचा भोवतालचा परिसर राज्य राखीव दल आणि बंडगार्डन पोलिस स्टेशन यांचे मार्फत मोकळा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाचा नकाशा आणि सभोवतालच्या परिसराचा अभ्यास करून राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे २ पथक आणि जलद प्रतिसाद दल यांनी विविध मार्गांनी कार्यालयात प्रवेश केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजला आणि ४ थ्या मजल्यावर अडकलेल्या २ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी विविध पथकांशी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी समन्वय केला आणि त्यांची सुटका करण्यात आली. ६ अतिरेकी ताब्यात घेण्यात राष्ट्रीय सुरक्षा गार्ड यांना यश आले.
कर्नल नितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या प्रात्यक्षिकात आरोग्य विभाग, पुणे मनपा, अग्निशमन दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे सुरक्षा कर्मचारी आदींनी सहभाग घेतला.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रात्यक्षिक पूर्ण झाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली. रक्षकाकडे असलेल्या अत्याधुनिक साधनाच्या कार्यप्रणालीविषयी माहिती जाणून घेतली. पथकानी केलेल्या कामगिरीचे कौतुक करुन सकाळी ११.३० वाजता तालिम समाप्त झाल्याचे त्यांनी जाहीर केले.