Type Here to Get Search Results !

खरीप हंगामात सोयाबीन बियाणे वापराबाबत शेतकऱ्यांना आवाहन

खरीप हंगामात सोयाबीन बियाणे वापराबाबत शेतकऱ्यांना आवाहन
पुणे दि.२५: शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षात खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालू वर्षी बियाणे म्हणून पेरणीसाठी वापरावे, तसेच ग्रामबिजोत्पादन, पीक प्रात्याक्षिके योजनांतर्गत आलेल्या उत्पादनातून बियाण्यांची निवड करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षापर्यंत वापरात येते. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. 
 
प्रमाणित बियाण्यांपासून वरीलप्रमाणे आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजुक असते. त्याचे बाह्य आवरण पातळ असल्याने त्याची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. 

बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यापेक्षा जास्त नसावे. साठवणूकीसाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवताना त्याची थप्पी ७ फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी.  

प्रति हेक्टरी बियाणे आवश्यकतेचा दर ७५ किलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता ७० टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी.

बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी, असे आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test