Type Here to Get Search Results !

बारामती ! कन्हेरी येथे कृषि विभागाकडून अत्याधुनिक फळरोपवाटिका

बारामती ! कन्हेरी येथे कृषि विभागाकडून अत्याधुनिक फळरोपवाटिका
बारामती - अलिकडे फुले आणि फळझाडांची शेती किफायतशीर होत असल्यामुळे फळझाडांची मागणी वाढत आहे. शेतीमध्ये अग्रेसर असणाऱ्या बारामती  तालुक्यात  विविध प्रकारचे नवीन फुल -फळझाडेही लागवडीखाली  येत आहेत.  शेतकऱ्यांना  तयार  आणि दर्जेदार  प्रतीची रोपे मिळावित हे धोरण लक्षात घेऊन बारामती तालुक्यातील मौजे कन्हेरी येथे कृषि विभागाकडून अत्याधुनिक फळरोपवाटिका तयार करण्यात आली असून तिचे काम अंतिम टप्प्यात आहे.

पूर्वी खडकाळ माळरान असलेल्या ठिकाणचे सपाटीकरण करुन येथे लागवडी योग्य जमीन तयार करण्यात आली आहे. त्याच जागेवर हा प्रकल्प उभा राहतांना दिसत आहे. ही फळरोपवाटिका एकूण 18 हेक्टर क्षेत्रावर पसरलेली आहे. या प्रक्षेत्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी, फळपीकांचे मातृवृक्ष 9.5 हेक्टरवर, पुष्पोत्पादन आणि औषधी वनस्पतीच्या लागवडीखाली 2.89 क्षेत्र  प्रस्तावीत असून 5.59 हेक्टर क्षेत्र फळरोपवाटिकेचे कार्यालय, शेतकरी निवास, 120 लोकांच्या आसन क्षमतेचे प्रशिक्षण सभागृह, कर्मचारी निवास व अंतर्गत रस्ते इत्यादी साठी वापरण्यात आले आहे. या फळरोपवाटिकेच्या सभोवती संरक्षण भींत तयार केली आहे.
 
या क्षेत्रावर तीन  पॉलीहाऊस आहेत. त्यापैकी  एक  पॉलीहाऊस अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फॅन व पॅड प्रकारचे आहे तर दुसरा पॉलीहाऊस  वायुविजन पद्धतीचे आहे. शितगृहाचा उपयोग  भाजीपाला कलमे/रोपे व फुलांचे उत्पादन घेण्यासाठी केला जातो.  तसेच याठिकाणी  2 शेडनेट व एक  मिस्ट चेंबरही आहे.  शेडनेटचा वापर मातृवक्षापासून केलेली कलमे हार्डनिंगसाठी करण्यात येतो.

मत्स्यपालनासाठी एक शेततळेही  येथे  निर्माण करण्यात आले आहे. सिंचन सुविधेसाठी एक विहिर व  एक कोटी  लिटर पाण्याची क्षमता असलेल्या चार आर.सी.सी. टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत. निरा डावा कालव्यातून पाणी उचलण्याची परवानगी प्राप्त झाली असून या कालव्यातून टाक्यांमध्ये पाणी साठविण्यात येते.
 
या फळरोपवाटिकामध्ये चिकू, आंबा, पेरु व डाळिंब या फळपिकांचे मातृवृक्ष  लागवड करण्यात आलेली असून त्यांचेपासून  दर्जेदार रोपे तयार केली जात आहेत. तसेच कृषि विज्ञान केंद्र, माळेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली 7.81 हेक्टर क्षेत्रावर आंबा, चिकू, डांळिब, पेरू, जांभूळ, कागदी लिंबू, अंजीर, सिताफळ, द्राक्ष डॉग्रीज रूट स्टॉक इत्यादीचे मातृवृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. याठिकाणी आंब्याचे 11 , चिकूचे 1,  डाळिंब, पेरू व सिताफळ  यांचे प्रत्येकी 3 वाण आहेत.  काही दिवसांत संत्रा, फणस, काजू, करवंद, नारळ, सुपारी, कोकम, आवळा, दालचिनी, जायफळ, काळीमीरी, औषधी वनस्पती व फुलझाडांची लागवड करण्यात येणार आहे  अशी माहिती  उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी दिली आहे.  


रोपवाटिकेतून तयार कलम-रोपे उपलब्ध होतात.  शेतऱ्यांना रोपे न करता फळबागा लावता येतात. कलम-रोपे तयार करण्यासाठी वेळ, पैसा व श्रम वाया जात नाहीत. कलम रोपांच्या गुणवत्तेची खात्री असते. दुर्मिळ आणि चांगल्या प्रतीची कलमे सहजासहजी उपलब्ध असल्याने फळबागा लावण्यास शेतकऱ्याला एक प्रकारचे प्रोत्साहन मिळते. 

एकाठिकाणी सर्व रोपे असल्याने रोपावरील किडी व रोगाचे नियंत्रण करणे सोईचे होते. रोपावर शास्त्रीय अभिवृद्धी करता येते. शिवाय  उत्पादनक्षम व जातीवंत फळझाडांची कलमे व रोपे तयार करता येतात. सावकाश वाढ होणाऱ्या झाडाचे रोपवाटिकेत चांगल्याप्रकारे संगोपन करून ती लागवडीसाठी वापरता येतात. कमी जागेत मोठ्या प्रमाणावर रोपे तयार करता येत असून रोपांचे संगोपन चांगल्याप्रकारे होते. 

विविध फळझाडांची रोपे शेतकऱ्यांना या रोपवाटिकेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. लाखांच्या संख्येत रोपे देणारी ही रोपवाटिका खऱ्या अर्थाने लाखमोलाची ठरणार आहे.

वैभव तांबे, उपविभागीय कृषि अधिकारी-सर्व सोयीसुविधेसह अत्याधुनिक फळरोपवाटिकेची निर्मिती करण्यासह येथे शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे. या फळरोपवाटिकेतून येत्या तीन वर्षात शेतकरी बांधवांना चांगल्या वाणांची दर्जेदार फळरोपे/कलमे  मिळतील

                                      
                   

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test