Type Here to Get Search Results !

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक देणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेलोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे उदघाटन

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक देणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे उदघाटन
पुणे, दि.३:-ऊसतोड कामगारांच्या जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावे असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यांच्या शिक्षणासाठी शासन सर्व सहकार्य करेल , अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.


सामाजिक न्याय भवन परिसरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या  दुरदृष्यप्रणालीद्वारे  उदघाटन प्रसंगी  ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे,  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी उपस्थित होते.
 मुख्यमंत्री श्री. ठाकरे  म्हणाले,  ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासोबत संत भगवान बाबा वसतिगृह योजनेच्या माध्यमातून २० वसतिगृहे भाड्याच्या जागेत सुरू करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगारांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. राज्याचा कुटुंबप्रमुख म्हणून महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल.

 ऊसतोड कामगार ऊन, पाऊस थंडी याचा विचार न करता मेहनत करतात. त्यांचे कुटुंब गावोगावी फिरत खूप मेहनत करतात आणि आपल्या आयुष्यात गोडवा आणतात. त्यांच्या प्रश्नांना नेमकेपणाने सोडविण्याचे काम महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे. ऊसतोड कामगारांच्या माताभगिनींच्या आरोग्याचेही अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठीदेखील विशेष लक्ष देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शासनाने गेल्या दोन दिवसात महत्वाच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करून कृतीतून राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.  स्व. गोपीनाथ मुंडे यांचे या क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन महामंडळाला त्यांचे नाव देण्यात आल्याचे सांगून स्व. मुंडे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधांचाही श्री.ठाकरे यांनी उल्लेख केला. ऊसतोड कामगारांशी स्वतः संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले

*कष्टकरी ऊसतोड कामगरांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न-अजित पवार*
उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले,मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने साथ दिल्याने महामंडळ अस्तित्वात आले. ऊसतोडणी करताना या मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यातील १३ जिल्ह्यातून येणाऱ्या ९ ते १० लाख ऊसतोड कामगारांना आरोग्य, शिक्षण आदी सुविधा देताना त्याला ओळख मिळणे गरजेचे आहे. त्यांची पेन्शन, तात्पुरती घरे, विमा सुविधा देण्याबाबतही विचार करावा लागेल. उसतोडणीसाठी आधुनिक साधनांच्या निर्मिती बाबतही विचार करावा. त्याचे जीवन सुसह्य होईल आणि त्यांच्या मुलांना प्रगतीची संधी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ऊसतोड कामगारांची सावकारांकडून पिळवणूक केली जाते. या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. ऊसतोड कामगारांची पुढची पिढी चांगले जीवन जगू शकेल असे प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून व्हावे. त्यांच्या मुलामुलींना राज्यातील १० जिल्ह्यात ४१ ठिकाणी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. मोठ्या शहरात मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करावे,असे त्यांनी सांगितले.

 ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी टनामागे १० रुपये याप्रमाणे साखर कारखान्यांकडून ११० कोटी आणि शासनाकडून ११० कोटी असे   यावर्षी २२० कोटी उपलब्ध होतील. महामंडळाच्या कल्याणकारी योजनांसाठी शासन सर्व सहकार्य करेल. कामगारांची पिळवणूक कुठल्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असेही श्री. पवार म्हणाले.

ऊसतोड कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण देणार-बाळासाहेब थोरात
महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले, साखर कारखाना ऊसतोड कामगारांच्या घामावर आणि श्रमावर चालतो. सतत ६ महिने घरापासून दूर रहात तो कष्ट करत असतो, त्याचे समाजावर असलेले ऋण लक्षात ठेवावेच लागेल.  दादासाहेब रुपवते समितीने या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठीच महामंडळाची स्थापना करण्याची शिफारस केली.

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यांच्यातील क्षमतांना संधी मिळवून देण्यासाठी महामंडळ स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या मुलांसोबत  मुलींच्या शिक्षणाचाही प्रयत्न करण्यात येणार आहे. ६ वर्षाच्या मुलांपासून शिक्षणाची सुविधा देण्यासाठी तज्ज्ञ गट तयार करावा, असे त्यांनी सांगितले.

आजचा दिवस स्मरणीय-धनंजय मुंडे
आजचा दिवस आपल्यासाठी स्मरणीय असल्याचे सांगून सामजिक न्याय मंत्री मुंडे म्हणाले, ऊसतोड कामगारांशी आपले भावनिक नाते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच अर्थसंकल्पात महामंडळाची घोषणा केली आणि तानामागे १० रुपये कारखाने आणि १० रुपये राज्य सरकार देईल असा निर्णय घेतला. हा निर्णय कामगारांच्या कल्याणासाठी महत्वाचा ठरेल. महामंडळाचे नाव स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव देऊन त्यांच्या कार्यप्रति सन्मानाची भावना आणि त्यांना आदरांजली अर्पण केल्याचे ते म्हणाले.

ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून नोंदणी केल्यानंतर आधार जोडणी करून त्याच मजुरांना काम द्यावे लागणार आहे. त्यामुळे मजुरांचा त्रास वाचण्यासोबत करखान्यांचाही फायदा होईल. मजुरांच्या मुलांच्या उच्च शिक्षणापर्यंतची जबाबदारी भविष्यात महामंडळ घेणार आहे. चांगल्या शिक्षणसंस्थांमध्ये त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी अशा संस्थाशी करार करण्याचाही प्रयत्न होणार आहे. महिलांच्या आरोग्याची जबाबदारी घेताना ऊसतोड कामगारांच्या विम्याची जबाबदारीही भविष्यात महामंडळाच्या माध्यमातून घेण्यात येईल. त्यांचे श्रम कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचाही उपयोग करण्यात येईल असे ते म्हणाले.

ऊसतोड कामगार नेते डॉ. डी. एल.कराड यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले. ऊसतोड कामगारांसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे ते म्हणाले. 

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते ऊसतोड कामगार नोंदणी संकेतस्थळाचे उदघाटनदेखील करण्यात आले. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाचे बोधचिन्ह, मार्गदर्शिकेचे व ऊसतोड कामगारांच्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन करण्यात आले. 

मान्यवरांच्या हस्ते ऊसतोड कामगारांचा सत्कार करण्यात आला व त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नोंदणी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री.नारनवरे यांना ऊसतोड महामंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी लघुचित्रफितीच्या माध्यमातून  महामंडळाच्या निर्मितीचा प्रवास मांडण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार नरेंद्र दराडे, अतुल बेनके, संजय दौंड, सुनील टिंगरे, रोहित पवार, सुनील शेळके, साखर आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, दिव्यांग आयुक्त ओमप्रकाश देशमुख आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test