समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळावे ही शासनाची भूमिका- उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत
पुणे दि.3: समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळाले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि त्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्षिक दीक्षांत समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव(दूरदृश्य प्रणालीद्वारे)तर कार्यक्रमस्थळी संस्थेचे अध्यक्ष रविंद देव, विद्या कुलकर्णी आदी उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात समान संधी मंडळ प्रत्येक ठिकाणी असावे, ही शासनाची भूमिका आहे. समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. उच्च शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देण्यासोबत शैक्षणिक गुणवत्तेकडेही लक्ष देण्यात येत आहे.
राज्यातील आदर्श शिक्षण संस्थेत महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.संस्थेने केलेले कार्य गौरवास्पद आहे. यापुढेही शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीसाठी संस्थेचे योगदान राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सर्व क्षेत्रात महिलांनी वेगळा ठसा उमटवला आहे. शिक्षण क्षेत्रातही महिलांनी चांगले यश संपादन केले असल्याचेही ते म्हणाले.
संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देव यांनी यावेळी विचार व्यक्त केले. त्यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच कोरोना कालावधीत केलेल्या वैद्यकिय सेवा कार्याबाबत माहिती दिली.
शिक्षणमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते स्नातकाना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी संस्थचे प्रमुख पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.