जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न
पुणे दि.१९- जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत रस्त्यावरील अपघात कमी करण्याबाबत विविध अशासकीय संस्थांचे सादरीकरण करण्यात आले.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे आदी उपस्थित होते.
रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपघात प्रवण स्थळ (ब्लॅक स्पॉट) कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्वरीत कार्यवाही करावी; अपघाताच्यावेळी मदतीसाठी त्वरीत धावून जाणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात यावे, असे डॉ.देशमुख यांनी सांगितले.
यावेळी नव्याने आलेल्या एकात्मिक रस्ते अपघात माहिती प्रणालीचे (आयरॅड) सादरीकरण आयरॅडचे प्रशिक्षण समन्वयक मनोज देशपांडे यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रणालीचा सर्वात चांगला उपयोग करून ३९ नवे अपघात प्रवण स्थळ (ब्लॅक स्पॉट) शोधले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
वाहतूकीच्या नियमांबाबत शाळांमधून पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून माहिती देण्यात येत असून जिल्ह्यातील विद्यापीठातदेखील असाच अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे श्री.ससाणे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ब्लुम्बर्ग संस्थेच्या स्वाती शिंदे, आयडीयल इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटचे गोविंद पानसरे, सेफ रोड फाऊंडेशनच्या समायरा, सेंन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टचे प्रशांत काकडे यांनी सादरीकरणाद्वारे जनजागृती उपक्रमांची माहिती दिली. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या हस्ते जनजागृती उपक्रमात चांगले योगदान देणाऱ्या संस्था आणि प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. बैठकीस विविध शासकीय विभागांचे अधिकारी, अशासकीय संस्थेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.