इंदापूर ! निरा भीमा कारखान्याचे विक्रमी ७ लाख टन गाळप अभिमानास्पद.
इंदापूर प्रतिनिध दत्तात्रय मिसाळ - देशाचे पहिले सहकारमंत्री व गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील साखर उद्योगाचा १० हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर माफ करण्याचा अतिशय धाडसी निर्णय घेतला. तसेच साखर कारखान्यांना थकीत कर्जाचे पुनर्गठन योजना जाहीर केली. त्याचबरोबर साखर निर्यातीस प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले आहे. अशाप्रकारे अमित शाह यांनी घेतलेल्या विविध धोरणात्मक निर्णयामुळे साखर उद्योगास बळकटी प्राप्त झाली आहे, असे गौरवोद्गर भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.५) काढले.
गिरवी, शेटफळपाटी येथे नीरा भीमा सहकारी साखर कारखानाच्या वतीने आयोजित नीरा-भीमा संवाद अभियानांतर्गत आयोजित मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने इथेनॉलचे दीर्घकालीन धोरण जाहीर केल्याने साखर उद्योगाला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. सहकार मंत्री अमित शाह हे आगामी काही दिवसात साखर उद्योगासाठी आणखी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय लवकरच घेणार आहेत, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली
चालू होणाऱ्या सन २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्ये कारखान्याने आजअखेर ७ लाख १० हजार मे. टन उसाचे गाळप पूर्ण करून ऐतिहासिक विक्रम केला आहे. कारखान्याने प्रतिटन रु.२५०० पेक्षा अधिकचा दर जाहीर केला आहे. यामध्ये रु. २१०० प्रमाणे पहिला ऊस बिलाचा हप्ता अदा करण्यात आला आहे.
कारखान्याने या परिसरातील शेतकरी, कर्मचारी, वाहतूकदार व इतर हजारो कुटुंबांना आर्थिक आधार दिला आहे. नीरा भीमा कारखाना हे या परिसरातील सहकाराची मंदिर आहे. आगामी काळात नीरा-भीमा व कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना हे राज्यातील पहिल्या टॉप टेन मध्ये येतील, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
राज्यमंत्र्यांच्या निष्क्रियतेने इंदापूर तालुका सर्वांगीण विकासामध्ये पाठीमागे गेला आहे. सध्या फक्त काही ठेकेदार व काही ठराविक पै-पाहूणे यांचा विकास चालू आहे. गेल्या साडेसात ८ वर्षात १ इंचही जादा क्षेत्र नव्याने पाण्याखाली आणलेले नाही, ही यांची कर्तबगारी आहे. तसेच गेल्या ८ वर्षात तालुक्यात एकही सहकारी संस्था काढण्याचा प्रयत्न केला नाही.
केवळ स्वतःच्या एकट्याच्या फायद्यासाठी तालुक्यात जातीयवादाचे विष पेरले आहे. पण जनता त्यांना माफ करणार नाही. तालुक्यातील एकाही युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही. वीज तोडणी मोहीम प्रश्नी सध्याचे राज्यकर्ते गप्प आहेत, त्यांना शेतकऱ्यांचे काहीही घेणे देणे नाही, अशी टीका यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली.
याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अँड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, महादेव घाडगे, मनोज पाटील, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, प्र. कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील उपस्थित होते.