लाखेवाडी येथे ऐतिहासिक मेळावा कार्यकर्त्यांची तुफान गर्दी,एक कर्मचारी गेल्याने फरक पडत नाही-माजीमंत्री हर्षवर्धन पाटील
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ- इंदापूर तालुक्यात माझ्या मंत्रिपदाच्या २० वर्षांच्या काळात चौफेर अशी नियोजनबद्ध पद्धतीने विकास कामे करण्यात आली. साखर कारखान्यांसह अनेक सहकारी संस्था निर्माण केल्या, २२ गावांना सात नंबरवरती कायमस्वरूपी बारमाही पाणी दिले, राज्यात सर्वाधिक वीज उपकेंद्रांची जाळे निर्माण केले, भीमा- नीरा नद्यांवर बंधाऱ्याचे जाळे उभे केले, लोणी देवकरला पंचतारांकित एमआयडीसी उभारून युवकांना रोजगार उपलब्ध केला, गावोगावी डांबरी रस्त्यांचे जाळे निर्माण केले, ग्रामीण रुग्णालयांस प्रशासन इमारती उभारल्या, तालुक्यात अनेक महाविद्यालये व शिक्षण संस्था उभारल्या, अशी शेकडो विकासकाने केल्यानेच इंदापूर तालुक्याची प्रगती झाली आहे. मात्र गेल्या आठ वर्षात तालुक्याची सर्वांगीण प्रगती खुंटली आहे, असा घणाघाती आरोप भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री भरणे यांचे नाव न घेता केला.
लाखेवाडी (ता.इंदापूर) येथे नीरा-भीमा कारखान्याच्या शेतकरी संवाद अभियानांतर्गत आयोजित मेळाव्यात बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी आक्रमक भाषेत सत्तारुढ बाजूचा खरपूस समाचार घेतला. त्यास कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. माझे स्वाभिमानी रक्त आहे, लाचार नाही. लढणारा माणूस आहे पळणारा नाही, अन्यायाविरोधात जशाच तसे, ठोशास ठोसा उत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशारा हर्षवर्धन पाटील यांनी दिला. पाठीमागून नव्हे तर समोरुन वार करणारे आम्ही राजकारण करतो असा टोला हर्षवर्धन पाटील यांनी लगावला.
स्वातंत्र्योत्तर काळानंतर शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी दूरदृष्टीने तालुक्याचा सर्वांगीण विकास केला. खाजगीचा सहकारी तत्त्वावर इंदापूर कारखाना उभारून अशक्य वाटणारे काम केले. भाऊनी स्वाभिमानी नेतृत्व व स्वाभिमानी कार्यकर्ते तयार केले. त्यानंतर मंत्रिपदाच्या काळात मी तालुक्यात शेकडो अंगणवाडी शाळा व इमारती बांधल्या, शेततळी उभारण्यास प्राधान्य दिले, जलसंधारणाची कामे, शेटफळ तलावाची उंची वाढविली, क्रीडा संकुल, राज्यातील पहिले बीओटी तत्त्वावरील एसटी स्टॅन्ड आदी सर्व क्षेत्रात विकास कामे केली. शासनाची कोणतीही योजना सर्वप्रथम इंदापूर तालुक्यात राबविली जात होती. वीस वर्षात जातियवादी राजकारण केले नाही, माणुसकी व मैत्री हिच आमची जात आहे. जातीचे राजकारण जास्त काळ टिकत नाही. सध्या रस्त्यांच्या विकास कामांच्या नावाखाली काही ठराविक ठेकेदार व काही पैपाहुणे यांचाच विकास चालू आहे. सर्वसामान्य जनतेचे, गरीब, मागासवर्गीय जनतेचे यांना घेणेदेणे अशी अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.
आजचा मेळावा हा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आहे, तालुक्यात परिवर्तनाची सुरुवात लाखेवाडी येथून होणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार शेतकरी विरोधी आहे. कर्जमाफी, वीजबिल माफी, कर्ज सवलत योजना राबविण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. वीज तोडली मोहीम राबवून हे सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे, याचा बदला शेतकरी मतदानातून घेतील असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला दिला.
विधानसभा निवडणुकीमध्ये काही नेते म्हणायचे की आमचे सरकार आणा, जर संपूर्ण कर्जमाफी आम्ही दिली नाही तर आम्ही.... सांगणार नाही, या भाषणाची करून देत हर्षवर्धन पाटील यांनी संबंधित राष्ट्रवादी नेत्याची नाव न घेता चांगलीच खिल्ली उडविली.
देशाला पंतप्रधान मोदी शिवाय पर्याय नाही. गृहमंत्री अमित शाह धाडसी निर्णय घेत आहेत. देशातील भाजप सरकार मजबूत आहे. उलट महाविकास आघाडीचे सरकार मधील अनेक मंत्री जेलमध्ये आहे. राज्यमंत्री हे नियोजन शून्य व निष्क्रिय असून त्यांच्यामुळे तालुका सर्वागिण विकास कामात पाठीमागे राहिला असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
चालू गळीत हंगामात नीरा-भीमा कारखान्याने ७ लाख १० हजार मे. टन उसाचे गाळप केले. कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याने ११ लाख मे. टन उसाचे गाळप केले. या दोन्ही कारखान्यानी सुमारे १८ लाख मेट्रिक टनाहून अधिकचे गाळप केल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाल्याचे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
प्रास्ताविक इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती तानाजीराव नाईक यांनी केले. यावेळी नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, अँड. कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, राजीव भाळे यांची भाषणे झाली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कालिदास आवाड तर आभार काशिनाथ अनपट यांनी मानले.
लाखेवाडी येथील एका कार्यकर्त्याने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यासंदर्भात बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी एक कर्मचारी गेला म्हणून काही फरक पडणार नाही, असे नमूद करीत जोरदार टिकास्त्र सोडले. तिकडे गेल्यावर आता गार गार लागत असेल, अशी टर उडविली. लढाईचे रणसिंग आता फुंकले असून परिवर्तनाची सुरुवात लाखेवाडी येथून होत असल्याचे हर्षवर्धन पाटील जाहीर करताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.