Type Here to Get Search Results !

२२१५ कोटींच्या बोगस बिलांसंदर्भात सूत्रधारास महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर (जीएसटी) विभागाकडून अटक

२२१५ कोटींच्या बोगस बिलांसंदर्भात सूत्रधारास महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर (जीएसटी) विभागाकडून अटक.
महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत नंदकिशोर बालूराम शर्मा (वय- ४२) यांस दि.०४/०४/२०२२ रोजी अटक करण्यात आली.

मे. साई गुरु एन्टरप्राईज व इतर आठ कंपन्यांबाबत वस्तू व सेवाकर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. या संदर्भातील तपासात या सर्व बोगस कंपन्या नंदकिशोर बालूराम शर्मा नावाचा व्यक्ती चालवत असल्याचे आढळून आले. सदर व्यक्तीच्या अधिक चौकशीमध्ये आढळून आले की, नंदकिशोर शर्मा हा अशा प्रकारच्या २६ बोगस कंपन्या चालवत असून, या कंपन्यांमार्फत आतापर्यंत २२१५ कोटी रुपयांची बोगस बिले बनविण्यात आलेली आहेत. या बोगस बिलांमध्ये डायमंड, कपडे, स्टील इत्यादी वस्तूंच्या बिलांचा समावेश आहे. याप्रकरणी वस्तू व सेवाकर विभागाला १२६ कोटी रुपयांची करचोरी उघड करण्यात यश आले आहे. ह्या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर धागेदोरे आहेत का? याबाबतचा तपास सुरु आहे.

महानगर दंडाधिका-यांनी सदर व्यक्तीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर धडक कारवाई सहाय्यक राज्यकर आयुक्त श्री. गणेश विलास रासकर, श्री. अविनाश ब. चव्हाण, श्री. संजय मो. शेटे व इतर सहाय्यक राज्यकर आयुक्त यांनी संयुक्तपणे राबविली तसेच, या कार्यवाहीत सर्व राज्यकर निरीक्षकांचे महत्वाचे योगदान राहीले. ही संपूर्ण कारवाई श्री. संजय विष्णू सावंत, राज्यकर उपआयुक्त व मा. श्री. राहुल व्दिवेदी (भा.प्र.से.) राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण- अ, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मा. श्री. राहुल व्दिवेदी (भा.प्र.से.) यांनी नुकताच राज्यकर सहआयुक्त अन्वेषण-अ, मुंबई या पदाचा कार्यभार स्विकारला असून, केवळ दोन आठवड्यांच्या कालावधीत बोगस बिलांसंदर्भात एक मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.

या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणा-यांस एक प्रकारे इशारा दिलेला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test