इंदापूर ! हर्षवर्धन पाटील यांची अमूल डेअरीस भेट
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - गुजरात राज्यातील आनंद येथील अमूल कडून इंदापूर येथील दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघास उच्च गुणवत्तेच्या कालवडी तयार करणेसाठी नवीन सीमेन वापरून पशुधन विकास कार्यक्रम राबविणे, अँटिबायोटिक मुक्त दुधासाठी आयुर्वेदिक औषधे पुरविणे, दूध उत्पादन खर्च कमी करून दूध उत्पादन वाढीचा कार्यक्रम हाती घेणे, अमूल पशुखाद्यचा विस्तार करणे आदी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार्य मिळणार आहे, यासाठी अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती दुधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
गुजरात सहकारी दूध विपणन संघ लिमिटेड संचलित आंनद येथील सुप्रसिद्ध अमूल ( आनंद मिल्क युनियन लिमिटेड ) डेअरीस हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी ( दि.21) भेट दिली. यावेळी त्यांनी अमूल च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विविध विषयावरती सविस्तर चर्चा केली. यावेळी नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील हे उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, आनंद येथील अमूल ने सहकार तत्वावर काम करीत देशात धवल क्रांतीचा पाया रचला आहे. देशात सहकाराचे मॉडेल म्हणून अमूल प्रसिद्ध आहे. अमूल ब्रँड ची ख्याती जगभरात आहे. इंदापूर येथील दूधगंगा दूध संघाने अमूल शी करार करून सुरू केलेले दूध संकलन सध्या प्रतिदिनी सरासरी 35 ते 40 हजार लिटर पर्यंत पोहोचले आहे, या प्रगतीबद्दल अमूलच्या अधिकाऱ्यांनी याप्रसंगी समाधान व्यक्त केले. तालुक्यात सध्या 32 संकलन केंद्रावरून हे दूध केले गोळा केले जात आहे. दूधगंगाचे संकलन वर्षभरात 1 लाख लिटर पर्यंत वाढविण्याच्या आराखड्यावर यावेळी चर्चा झाली. त्यानुसार नियोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. चांगली फॅट व अधिक दूध उत्पादन देण्याची क्षमता असणाऱ्या गाई तयार करणेसाठी कालवडी निर्मितीसाठी इंसेमिनेशन शिबिरे दुधगंगा संघ घेणार आहे. वरील योजनांचा लाभ दूध उत्पादकांना देण्यासाठी अमूलचे अधिकारी इंदापूर तालुक्यातील लवकरच येणार आहेत, अशी माहितीही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.