भाजपमुळे सर्वसामान्य माणसाला प्रतिष्ठा- हर्षवर्धन पाटील
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - भाजपा हा तळागाळातील सर्वसामान्य माणसाला आपला वाटणारा पक्ष आहे. देशहित व सर्वसामान्यांचे हित हीच भाजपची विचारधारा आहे. भाजप मुळे देशातील सर्वसामान्य माणसाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे, असे गौरवोद्गार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी ( दि.६) काढले.
इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो येथे भाजपच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील बोलत होते.
भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला राजकीय पक्ष ठरला आहे. भाजप मुळे सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली केंद्र सरकार अनेक लोकोपयोगी योजना यशस्वीपणे राबवित आहे. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार महिन्याला २ हजार रूपयांचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे. नवे सहकारमंत्री अमित शाह यांच्यामुळे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला बळकटी प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्वाखाली भाजप सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अगोदरच झटत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. आगामी काळात तालुक्यातील प्रत्येक घराघरात जाऊन भाजपची ध्येयधोरणे प्रभावीपणे पोहोचण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी स्थापना दिनानिमित्त भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्रास्ताविक भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी केले. कार्यक्रमामध्ये शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती वणवे, माऊली चवरे, तानाजी थोरात, गजानन वाकसे, बापू जामदार, पांडुरंग शिंदे, तेजस देवकाते आदी उपस्थित होते.