सोमेश्वरनगर ! सोमेश्वर कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे सर्वच्या सर्व ऊस गाळप होईल-उपमुख्यमंत्री अजित पवार
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारवाढ प्रकल्पाचा शुभारंभ
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील 'श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची' वाटचाल योग्यदिशेने सुरू असून विस्तारवाढ प्रकल्पामुळे भविष्यात सर्व नोंदीत आणि बिगरनोंदीत ऊसाचे गाळप पूर्ण क्षमतेने होईल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. विस्तारवाढ प्रकल्पाचा शुभारंभ आणि गव्हाण पूजन कार्यक्रमात प्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप ,व्हाईस चेअरमन आनंदराव होळकर,संचालक राजवर्धन शिंदे, संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड ,प्रवीण कांबळे ,अभिजित काकडे सह संचालक मंडळ तसेच आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, बाळासाहेब तावरे, प्रशांत काटे, प्रमोद काकडे देशमुख, पं.स.सभापती नीता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे सोमेश्वरआदी उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, श्री सोमेश्वर कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे प्रतिदिन अडीच हजार मे. टन च्या क्षमतेने सर्वच्या सर्व ऊस गाळप होईल. यामुळे सभासदांना चांगला फायदा होण्यास मदत होईल.
उन्हामुळे ऊस तोडणीला मर्यादा असल्याने यापुढे हार्वेस्टिंग यंत्राचा वापर करावा लागेल. शेतीसाठी पाणी उपलब्ध असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रथमतः विचारात घेतला पाहिजे. गावे टँकर मुक्त होणे आवश्यक आहे. ऊसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. त्यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी पाण्याचा अंदाज घेऊनच ऊसाचे पीक घ्यावे.
आज मोठ्या प्रमाणात साखर निर्यात होत असून ही चांगली बाब आहे. मात्र त्यासोबत सभासद शेतकरी आणि साखर कामगारांनादेखील लाभ भेटला पाहिजे. शासनाने साखर कारखान्यांना इथेनॉल, डीसलेरी व ऑक्सिजन निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. सर्व सहकारी साखर कारखान्यानी याकडे लक्ष देऊन त्याची अंमलबजावणी करावी.
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १६८ गावे आहेत. या कारखान्याची विस्तारवाढ करताना सर्व सभासदांना संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. कारखाना परिसरात सुरू असलेली विकासकामे दर्जेदार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार श्री. जगताप म्हणाले, सोमेश्वर कारखान्याची वाटचाल सक्षमपणे सुरू असल्याचे समाधान आहे. विस्तारीकरणाने सभासदांवरील ओझे कमी होण्यास मदत होईल. दर चांगला मिळत असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ऊस या ठिकाणी येत आहे.