पुणे ! दिव्यांगासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ घ्या-अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण.
पुणे, दि.५:- दिव्यांग व्यक्तीचे आयुष्य सुखकर करण्यासाठी शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांचा लाभ घेऊन प्रगती करावी , असे आवाहन अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी केले.
कोरेगाव पार्क येथे मुलाच्या अंधशाळेत हडपसर मेडिकल असोसिएशन आणि सिद्धेश्वर महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांना मदत करणाऱ्या लेखनिकाच्या निरोप समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर, प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे, सिद्धेश्वरचे डॉ.शंतनु जगदाळे,हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन आवणी आदी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, विद्यार्थी दिव्यांग नसून दिव्य आहेत. त्यांनी आपण समाजापेक्षा वेगळे आहोत अशी भावना मनात न बाळगता स्वत:च्या अंगी असलेल्या क्षमतेचा पूर्णपणे उपयोग करावा. आयुष्यात अडचणी आल्याशिवाय यश मिळत नाही. स्वतःच्या उणिवांचा शोध घेवून त्यावर मात करावी आणि आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये वाटचाल करावी , असेही श्री. चव्हाण म्हणाले. संस्था व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस त्यांनी
शुभेच्छा दिल्या.
*दिव्यदृष्टीने सृष्टी बघण्याचे सामर्थ्य*
डॉ. पाटोदकर म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये दृष्टी नसतांनाही दिव्यदृष्टीने सृष्टी बघण्याचे सामर्थ्य आहे. समाज त्यांच्या पाठीशी असल्याने निराश न होता त्यांनी ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा. ही खऱ्याअर्थाने त्यांच्या आयुष्याची सुरुवात आहे. दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे हा जीवनातील महत्वाचा क्षण असून त्याचा आनंद घ्यावा. आपल्याकडे असलेले ज्ञान समाजातील इतर घटकांपर्यंत आणि आपल्या बांधवांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. जीवनात मिळालेल्या संधीचे सोने करावे, अगदी भारतीय प्रशासकीय सेवेतदेखील जावे असेही त्यांनी सांगितले.
श्री. आवणी म्हणाले, अंधशाळा शाळा नसून येथील विद्यार्थांचे घर आहे. नि:स्वार्थ भावनेने काम करुन येथील विद्यार्थांना विनामूल्य शिक्षण दिले जाते. समाजाने अशा संस्थांना मदत करुन सामाजिक जबाबदारी पार पाडावी.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी व लेखनिकांचा शालेय साहित्य व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले.