Type Here to Get Search Results !

कोऱ्हाळे खुर्द येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम संपन्न.

कोऱ्हाळे खुर्द येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम संपन्न.
सोमेश्वरनगर - कोऱ्हाळे खुर्द (ता बारामती) गावाच्या विकासासाठी ९ कोटी ६४ लाख रुपयांच्या  विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. विकासासाठी मिळणाऱ्या निधीतून गावाचा सर्वांगिण विकास करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

           बारामती तालुक्यातील मौजे कोऱ्हाळे खुर्द  येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी  श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर,  उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे,  सरपंच गोरख खोमणे आदी उपस्थित होते.

        श्री. पवार म्हणाले, बारामतीच्या गाडीखेल गावाच्या परिसरात वन विभागाच्या जागेत वाघ आणि सिंह सफारी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होतील. अष्टविनायकसाठी शासनाने ५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे मंदिर परिसराचा कायापालट होण्यास मदत होवून भाविकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होतील. 

बारामती येथील राजीव गांधी सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर मध्ये अत्याधुनिक  उपकरणे आणि प्रयोगशाळा उपलब्ध आहे. खेड्यातील मुलांनी शाळेच्या माध्यमातून   या केंद्राला भेट द्यावी, जेणेकरून  त्यांच्या ज्ञानात भर पडेल. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे ही आता  काळाची गरज आहे. 

  बारामती नीरा रस्ता चार पदरी करण्यात येणार आहे,  रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी.  यंदा ऊसाचे पीक चांगले आहे.  गावाच्या विकासासाठी सर्वांचाच सहभाग आवश्यक असतो. ग्रामपंचायतीने लोकाभिमुख पारदर्शक कारभार करावा, गोरगरीब लोकांना घरकुलाच्या माध्यमातून निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावीत. शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात. गावात सलोख्याचे वातावरण ठेवावे.  विकास कामासाठी निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. 
 
            यावेळी कोऱ्हाळे खुर्द येथील महेश साळुंखे यांनी काठमांडू येथे  झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन स्विमिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाला श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे,  संचालिका  प्रणिता खोमणे, उपसरपंच लक्ष्मण मदने, ग्रामसेवक रमेश पवार, ग्रामस्थ  आदी उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर मौजे लाटे येथील नीरा नदीवरील लाटे ते खुंटे नवीन पुलाचा  पायाभरणी कार्यक्रम श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लाटे गावचे सरपंच उमेश साळुंखे व ग्रामस्थ उपस्थित होते.

कीप ऑन रोलीन स्केटिंग क्लब बारामतीच्या ५ ते १४ या वयोगटातील मुलांनी पुणे ते बारामती हा प्रवास स्केटिंग करून पूर्ण केला याबाबत श्री पवार यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी स्केटिंग प्रशिक्षक तनिशक शहा आणि स्केटिंग टीम उपस्थित होती. 

विविध विकास कामांची पाहणी

श्री. पवार यांनी आज  गाडीखेल येथील वन विभागाच्या नियोजित वाघ-सिंह सफारीची जागा, कटफळ येथील नियोजित प्रादेशिक परिवहन ट्रॅक आणि ऑफिसची जागा, बारामती शहरातील बाबूजी नाईक वाड्याचे बांधकाम, दशक्रिया विधी घाट, कऱ्हा नदी सुशोभिकरण अंतर्गत   गॅबियन वॉल व कसबा वेस येथील फूट ब्रिजची, कऱ्हा नदी जवळील पानवटा, नियोजित हनुमान मंदिर सभा मंडप,  ख्रिश्चन कॉलनी येथील ब्रिज व भिंत, जेष्ठ  नागरिक संघाची इमारत इत्यादी विकास  कामांची पाहणी करून  अधिकाऱ्यांना कामे  दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
      
यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपवनसंरक्षक राहुल पाटील,  तहसिलदार विजय पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार पाटील, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे,  उपअभियंता सा. बा. वि. राहुल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. डी. लोणकर आदी उपस्थित होते.
           

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test