बारामती ! बारामती येथे ८ ते १० एप्रिल दरम्यान धान्य महोत्सव
अधिकाधिक नागरीकांनी लाभ घेण्याचे कृषी विज्ञान केंद्राचे आवाहन
बारामती, दि. १ : शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल शेतकऱ्यांकडून थेट शहरातील नागरिकांना रास्त दरात उपलब्ध व्हावा आणि शेतकरी, शेतकरीगट, शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गट यांना शेतमालाच्या विक्रीतून योग्य आर्थिक मोबदला मिळावा यासाठी ८ ते १० एप्रिल या कालावधीत कृषि विज्ञान केंद्र, शारदा महिला संघ आणि कृषि उत्पन्न बाजार समिती बारामाती यांच्यावतीने धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात गहू, तांदूळ, ज्वारी, भरडधान्य, उडीद, मटकी, चवळी, हुलगा, तीळ, तूर डाळ, काबुली, हरभरा छोले , साधा हरभरा, बाजरी, काजू, बदाम, कोकम, हळद, विविध प्रकारचे मसाले, फळे, आदी शेतमाल विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. रयत भवन, मार्केट यार्ड बारामती येथे सकाळी ९ ते रात्री ८.३० या वेळेत महोत्सव असणार आहे.
भोर, वेल्हा, जुन्नर, पुरंदर, बारामती, फलटण, रत्नागिरी, लांजा, पाथर्डी, सांगली सोलापूर इत्यादी ठिकाणाहून शेतकरी आपले धान्य कडधान्य, भाजीपाला, फुले व फळे विक्रीसाठी ठेवणार आहेत.
ग्राहकांनी धान्य मोहत्सवाला भेट देऊन रास्त दरातील, ताजा, स्वच्छ, गुणवत्तेचा माल खरेदी करून लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.