Type Here to Get Search Results !

पुणे ! लोणावळा शहराचा स्वच्छते बाबत लौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे ! लोणावळा शहराचा स्वच्छते बाबत लौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे : लोणावळा शहराने स्वच्छता स्पर्धेत देशपातळीवर कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यापुढेही हा लौकिक कायम राहील यादृष्टीने काम करावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. देशभरातून आलेल्या पर्यटकांना लोणावळा शहरात निश्चित आनंद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महालक्ष्मी महिला मंच लोणावळा येथे आयोजित स्वच्छ सर्व्हेक्षण- स्वच्छतादूत आणि कोरोना योद्धा-आरोग्यदूत पुरस्कार  वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.  लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, महालक्ष्मी महिला मंचच्या अध्यक्षा सुजाता मेहता, लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्री.कोश्यारी म्हणाले,  स्वच्छता स्पर्धेत लोणावळा शहराने देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोणावळा शहराच्या या कार्याचा देशपातळीवर गौरवही झाला आहे. लोणावळा सुंदर आहे, आणखी सुंदर शहर बनविण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे. यापुढेही स्वच्छ, सुंदर लोणावळा ही देशपातळीवरील ओळख कायम राहील, देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना आनंद मिळेल.


कोरोना कालावधीत लोणावळ्यासह संपूर्ण देशातील नागरिकांनी केलेले कार्य गौरवास्पद आहे. आपल्या देशाने आपली परंपरा, संस्कृती जपली आहे. देशात कोणतेही संकट आले त्यावेळी आपला संपूर्ण देश एकत्रित काम करत असल्याचे दिसून आले. कोरोना काळातही देशाने एकत्रित लढा दिला. आपण कायम एकत्रित राहिलो तर संकटच येणार नाही. देशाची संस्कृती,परंपरा जपत यापुढेही असेच एकत्रित राहूया, असे ते म्हणाले.

माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी यावेळी विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात श्रीमती जाधव यांनी महिला मंचाच्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच लोणावळा शहराने स्वच्छता स्पर्धेत केलेले कार्य तसेच कोरोना कालावधीत केलेल्या कार्याबाबत माहिती दिली.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते लोणावळा शहरात स्वच्छतेसाठी आणि कोरोना काळात अग्रेसर राहून काम केलेल्या संस्थांचा तसेच व्यक्तीचा स्वच्छ सर्व्हेक्षण- स्वच्छतादूत आणि कोरोना योद्धा-आरोग्यदूत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 यावेळी लोणावळा शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, महिला मंचाच्या प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test