महिला दिन विशेष ! कमलताई...
सोमेश्वरनगर - तसे हे चित्र फार बोलके आहे तसेच ते मनालाही बघणारे आहे ,पुरंदर तालुक्यातील नीरा गावातील वास्तव आहे.निरेत केव्हा ही फेरफटका मारला की ही कमलताई दिसते.कधी रस्त्यावर तर कधी बाजूला बसलेली...तशी कुणाला कांही मागत नाही अगर उपद्रव ही देत नाही.ती तिच्या धुंदीत असते..एवढी रस्त्याने वर्दळ असते, भरधाव वेगाने जाणारी वहाने असतात पण ती मात्र तिच्या विचारात गुंग असते.वहाने तिला पास करुन निघून जात असतात.तशी ही अभागी माता भगिनी व कन्या आहे तो तिच्या वाट्याला आलेला भोग आहे ही एक प्रातिनिधिक महिला आहे.समाजात आज ज्या अशा अभागी महिला आहेत.खरं तर ती त्यांचं जणू ती प्रतिनिधी म्हणून वावरताना दिसते.समाज हे रोज वास्तव अनुभवतोय.पण डोळे असून अंधळ्यासारखा वागतोय हे ही सत्य आहे.स्त्री ही दुर्बल आहे हे माहित असून ही तिच्या या परिस्थितीला जबाबदार आपणच ना..समाज म्हणून. कारण आपण समाजाचे घटक आहोत.मग हे विदारक चित्र असे का ? याची आपण उत्तरे शोधणार आहोत की नाही? आणि शोधणार असेल तर कधी ? प्रत्येक गावात अशा निराधार स्त्रीया दिसतात.वाट्याला आलेला भोग म्हणून त्या जीवन व्यतीत करीत असतात.समाज, राज्यकर्ते सोयीस्कर डोळेझाक करुन त्यांच्या शेजारुन अलिशान मोटारीतून धुळ उडवत निघून जातात.मग या अशा दुर्लक्षित घटकांकडे आपण केव्हा लक्ष देणार आहोत.स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे होऊन गेली.सरकारे आली अन गेली हे घटक मात्र तसेच राहिलेत..यांच्या अवस्थेकडे व्यवस्थेला लक्ष द्यायला वेळच नाही.मग यांनी भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत असे का म्हणावे ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.तरीही शासन,शासनकर्ते सांस्कृतिक उपक्रम म्हणून महिला दिन म्हणून साजरा करत असते.या दुर्दैवी जीवांना त्याचे कांही सोयरसुतक नसते.मग प्रश्न पडतो हा तिरंगा हातात घेऊन स्वातंत्र्याचा जयजयकार ते कुणासाठी करतात.तर याचे उत्तर हा वांझोटा जयजयकार. स्वातंत्र्याची फळे चाखणारी कार्यकर्त्याची फळी वेगळीच आहे.फळी नाही तर राजरोसपणे नियम अटी याच्या मखरात बसवून फळे खाणारी टोळी आहे.यांच्यापर्यत त्यातील शिंथडलेली भाताची शितं सुद्धा येत नाहीत ही सामाजिक शोकांतिका आहे.प्राण्यासारखं जगणं ही यांच्या वाट्याला आलेली स्वातंत्र्याची ही मधुर फळंच म्हणावी लागतील.स्वातंत्र्याच्या नादात स्वार्थी आणि लबाड कार्यकर्त्यांना सभोवताली ऊत आलेला दिसतो.त्याग,समर्पण या गुणांचा लोप झालेला दिसतो.हे प्रबोधन तरी होणार कधी ? आता एक तर बंड करून उठावे लागेल नाही तर समाजसुधारक संत गाडगेबाबा,म.फुले,माई सावित्रीबाई फुले,राजर्षी शाहु महाराज, डॉ.आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील,बाबा आमटे, सिंधूताई सपकाळ यांनी पुन्हा जन्म घ्यायला हवा याची वाट पहावी लागणार....पण पुन्हा सहिष्णुता,सौजन्यशीलता उपोषण यांचा जप करत बसावं लागेल.त्यापेक्षा आज विद्रोही बनावं आणि दुःखीताची आसवं पुसावीत. समाज कांही म्हणो त्याशिवाय दुर्लक्षित घटकांना न्याय मिळणार नाही.प्रस्थापितांचा,व्यवस्थेचा पराभव करणे हे एकच उत्तर आहे.ती वेळ फार दूर नाही...कारण काळ वाटच पहात असतो....
...एस एस गायकवाड,करंजेपुल...