पुणे ! महिलांसाठी पॉवर योगा व स्वसंरक्षण प्रशिक्षण
क्रीडा विभागाचा उपक्रम
पुणे दि.9: जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, स्टार इंटरप्रायजेस तसेच येथील इंडो तायक्वादो दोजांग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित महिलांसाठी पॉवर योगा व स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला.
यावेळी महाविद्यालयीन युवती, शालेय विद्यार्थिनी, महिला उपस्थित होत्या. जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी क्रीडा क्षेत्रात देशाला विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये महिला खेळाडूंनी पदके मिळवून दिल्याचा गौरवपूर्ण उल्लेख याप्रसंगी केला.
योग प्रशिक्षिका मनाली देव घारपुरे यांनी योगासन प्रात्यक्षिके दाखवली. नोकरदार व व्यवसायिक महिलांसाठी सहज योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. विखे पाटील मेमो. स्कूलच्या क्रीडा शिक्षिका सपना यादव यांनी समाजकंटक, चैन स्नॅचर्स यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्याबाबतचे स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमास उपसंचालक प्रमोदिनी अमृतवाड, क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकते, शिल्पा चाबूकस्वार, महिला उद्योजिका स्टेला डिसोझा आदी उपस्थित होते.