आत्मनिर्भर भारतासाठी विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य विकसित करावे- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
इंदापूर - पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट बिझनेस स्कूल पुणेच्या विद्यार्थ्यांचा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यावर अभ्यास दौरा
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट बिझनेस स्कूलच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यावर पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट बिझनेस स्कूल पुणेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मार्केटिंग मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, एच.आर मॅनेजमेंट, ॲग्री बेस मॅनेजमेंट, बिझनेस अँड आयटी मॅनेजमेंट अभ्यास अंतर्गत विद्यार्थ्यांनी साखर कारखाना आणि बायोप्रॉडक्ट अभ्यासासाठी भेट दिली यावेळी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आत्मनिर्भर भारतासाठी विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य विकसित करावे असे आवाहन केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' आत्मनिर्भर भारतासाठी केंद्रीय पातळीवर विविध योजना राबविल्या जात असून या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध कौशल्याच्या जोरावर उद्योजकता आत्मसात करावी. आत्मनिर्भरता अंतर्गत लघु व मध्यम उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारचे धोरण आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सरकारच्या माध्यमातून स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया सारख्या योजनेद्वारे उद्योगाच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत.