मुंबई, दि. 2 : महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ या मासिकाच्या ‘मराठी भाषा’ विशेषांकाचे व ‘महामुंबईचा महाविकास’ या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते झाले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर, संचालक (माहिती व प्रशासन) गणेश रामदासी उपस्थित होते. मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांनी ‘लोकराज्य’ व ‘महामुंबईचा महाविकास’ या पुस्तिकेचे कौतुक केले.
सर्वप्रथम राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री. श्रीवास्तव यांचे पुष्पगुच्छ देऊन श्री. कपूर यांनी अभिनंदन केले. तसेच महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य आणि नैमित्तीक प्रकाशनांची माहिती दिली.
लोकराज्यचा फेब्रुवारी विशेषांक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त असून, मराठी भाषा ही अभिजातच असून केंद्र शासनाला राज्य शासनाने पाठविलेल्या प्रस्तावावर आधारित विशेष लेख हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. मराठी भाषा, मराठी भाषा विभागाचे कार्य, आदिवासी साहित्याचे महत्व, राजधानी दिल्लीतील मराठी, वारसा हस्तलिखितांचा यांसह विविध विषयांचा या अंकात अंतर्भाव आहे. याबरोबरच संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त विशेष लेख, याशिवाय कोविड-19 चे उत्परिवर्तन, ऐतिहासिक अधिवेशन आदि लेखांचा अंकात समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळातील निर्णय आणि महत्त्वाच्या घडामोडी ही सदरे नेहमीप्रमाणे आहेत.
याबरोबरच ‘महामुंबईचा महाविकास’ या पुस्तिकेतून राज्य शासनाने दोन वर्षात मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी राबविलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. लोकराज्यचा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.