"मराठा,कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी"या समाजासाठी राबविण्यात येणा-या भविष्यकाली योजनांसाठी लेखी सूचना पाठविण्याचे सारथीचे आवाहन
पुणे,दि.४: "मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी" या समाजातील महिला, विद्यार्थी, तरुण, शेतकरी या विविध घटकांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने सारथी संस्थेने सन २०३० पर्यंत कोणकोणते उपक्रम प्राधान्याने राबविले पाहिजेत,याबाबत राज्यातून सूचना मागविण्यात येत आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेचा प्रस्तावित भविष्यकालीन योजनांचा आराखडा (Vision Document) - २०३० हा सर्वसमावेशक व व्यापक होण्यासाठी, सारथी संस्थेने सन २०३० पर्यंत कोणकोणते उपक्रम प्राधान्याने राबविले पाहिजेत याबाबत दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंत सूचना लेखी स्वरुपात पाठवाव्यात असे आवाहन सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.
"मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी" या समाजातील बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून आहेत.यास्तव या घटकांचे शेतीवरील अवलंबित्व कमी करुन त्यांना विविध क्षेत्रातील रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करणे, शेतकरी कुटूंबांचे वार्षिक उत्पन्न वाढविणे, शेतकऱ्यांचा तसेच महिलांचा ताणतणाव क्लेश (Distress) कमी करण्यासाठी उपाययोजना करणे यासाठी या गटातील समाज हा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी सुनियोजित उपाययोजना कालबध्द पद्धतीने करण्याचा सारथी संस्थेचा मानस आहे.
राज्यातील "मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था दि. १९ फेब्रुवारी, २०१९ पासून कार्यरत आहे. सारथी संस्थेच्या उद्दिष्टांची कालबद्ध पूर्तता होण्यासाठी संस्थेचा “भविष्यकालीन योजनांचा आराखडा (Vision Document)- २०३०" तयार करणेबाबतचा उपक्रम सारथी संस्थेने हाती घेतला आहे. यात नाविन्यपूर्ण व कल्पक योजनांचा समावेश करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, विचारवंत यांचे अभिप्राय प्राप्त करून घेण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
सारथी संस्थेमार्फत या समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत.एम. फील व पीएच.डी अभ्यासक्रमासाठी नोंदणीकृत विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती संघ लोकसेवा आयोग व राज्यसेवा आयोग पूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क, विद्यावेतन व पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एकरकमी आर्थिक साहाय्य हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीचे फलित म्हणून संघ लोकसेवा आयोगाच्या २०१९ च्या नागरी सेवा परीक्षेमध्ये सारथी संस्थेने अर्थसाहाय्य व मार्गदर्शन केलेल्या २२ विद्याथ्र्यांची अंतिम निवड झाली आहे. त्यात ५ विद्यार्थी हे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS). ०८ विद्यार्थी हे भारतीय पोलीस सेवा (IPS) व ३ विद्यार्थ्याची भारतीय महसूल सेवा (IRS) यामध्ये निवड झाली आहे.नवीन राबविण्यात येणा-यां उपक्रमांमध्ये या समाजघटकातील विद्यार्थ्यांचा प्रशासकीय सेवेत सहभाग वाढविण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग, तरुणांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने कौशल्यवृध्दी व कृषी प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण, प्रज्ञावान शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती,महिला सक्षमीकरणाकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा मानस आहे.
सारथी संस्थेच्या स्थापने बाबतचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत काढलेला दिनांक दि. ०४ जून, २०१८ या शासन निर्णयातील संस्थेची उद्दीष्टांचा समावेश करण्यात आला आहे.तरी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक परिस्थितीनुरूप या समाज गटातील महिला, विद्यार्थी, तरुण, शेतकरी, जेष्ठ नागरिक इत्यादी विविध घटकांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने संस्थेने भविष्यात सन २०३० पर्यंत कोणकोणते उपयुक्त उपक्रम प्राधान्याने राबविले पाहिजेत, याबाबत आपल्या सूचना संस्थेस ईमेल आयडी sarthipune@gmail.com तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे, बालचित्रवाणी इमारत,गोपाळ गणेश आगरकर रोड,पुणे महाराष्ट्र-४११००४ येथे लिखित स्वरुपात पाठवाव्यात, तसेच अधिक माहितीसाठी https://sarthi-maharashtragov.in असे संकेतस्थळ आहे.तरी या उपक्रमातील सर्वांच्या सूचना व सहभागामुळे संस्थेचा प्रस्तावित भविष्यकालीन योजनांचा आराखडा (Vision Document) - २०३० सर्व समावेशक व व्यापक स्वरूपाचा होऊन, राज्यातील "मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असे आवाहन सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.