सोमेश्वर विद्यालयात सन २००२-२००३च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न.
तब्बल वीस वर्षांनंतर एकत्र आले माजी विद्यार्थी.
सोमेश्वरनगर - मानवी मनात कांही सदगुण रुजलेले असतात.जाणीवा नेणीवांनी ते ओतोप्रोत भरलेले असतात.वाढत्या वयाबरोबर ते प्रगल्भ होतात.मग ते साकारण्यासाठी हात धडपडू लागतात तसं तेही इतकं सोप नसतं तरी प्रयत्नांना यश येतं म्हणतात तसच कांही तरी... रविवार दिनांक ६ मार्च २०२२ रोजी बारामती तालुक्यातील सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर येथे सन २००२-२००३च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला.तब्बल वीस वर्षांनंतर एकत्र आलेले विद्यार्थी व शिक्षकवर्ग.एक वाढत्या वयाची वेगळीच अनुभूती..शिक्षकही वयवृद्ध झालेले..कांही पंचेद्रियांची उणीव भासणारे पण उत्साही.तरुणाला लाजवेल असे तर विद्यार्थी-विद्यार्थ्यींनी कुमार गटातून प्रौढत्वाकडे वाटचाल करणारे.. व्यवहारी जगात गरुडझेप घेणारे..संसारीक जगात स्थिरावत चाललेले.. विद्यार्थीदशेतील विद्यार्थीपण आठवण्यासाठी शिक्षकांनाही कसोटीचा क्षण होता.त्याला कारण व्यक्तिमत्वातील बदल..तरीही हळूहळू भूतकाळातून वर्तमान काळाशी नातं जोडून गुण अवगुणांची बेरीज करुन आठवसीमेवरुन आठवत आठवत एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहून आश्चर्य-आनंद मिश्रीत हास्याचे फवारे न कळत उडत होते तशी अगंतुक भेटीच्या जिज्ञासामय तृप्ततेची वाळूत रेघ मारावी तशी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवत होती..त्याला कारण होते अनामिक ओढीतून कृतज्ञतेची कुतुहलमय भेट..प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य,आनंद या भावना जाणवत होत्या.. पूर्वाश्रमीचा दहावी तुकडी ब चा वर्ग सजवला होता.त्याच वर्गात बसण्याचा अट्टाहास विद्यार्थ्यांचा होता..कारण त्यांना भूतकाळ अजमावयाचा होता.विद्यार्थीदशेच्या अनुभूतीचा आस्वाद चाखायचा होता.तात्कालीन मुख्याध्यापक श्री.एस.डी.जगताप सर यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले.शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी वर्ग सजला..सुगंधी उदबत्तीने अगोदरची सुगंधी मने प्रफुल्लित झाली.माजी विद्यार्थी सागर पवार आणि त्याचे सहकारी घरच्या शुभकार्यासारखे धडपडत होते.त्यात प्रेमळ ओलाव्याची साक्ष जाणवत होती.तर कांही विद्यार्थ्यीनी माहेरला आल्यावर कर्त्या भावाची एखादी चूक सापडावी तोच धागा पकडून त्याची प्रेमळपणे टर उडवावी तशा कांही विद्यार्थीनी भावांच्या उणीवावर बोट ठेवून त्यांना जागेवरच शहाण्या करीत होत्या..एक कुटुंबवत्सल वातावरण तयार झालं होतं.एकेकाळी एकत्र वावरलेले जीव दूरस्त झाल्यामुळे निर्माण झालेला कळतेपणाचा प्रेमळ ओलावा हेच त्याचं प्रमुख कारण होतं.सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करुन दिला. नंतर गुरु चरणी कृतज्ञता म्हणून प्रत्येक शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी झालेल्या उणीवा भरुन काढण्यासाठी मुली नेटकेपणाच्या सूचना देत होत्या.त्या प्रसंगी अपत्यात मुलगी असावी ही जाणीव मनाला चाटून गेली श्री.एम.डी.बाबर सर यांनी वास्तवतेचे भान जागृत करत हास्याचे फवारे उडवत आणखीनच रंगत आणली. श्री.डी.टी.वाडकर सर यांनी उपदेश व मार्गदर्शन यांचा संगम साधून मनोगत व्यक्त केले.श्री.के.एस.सोरटेसर यांनी शिक्षकांचे नाते श्रेष्ठ कसे हे सांगितले.सध्याचे प्राचार्य एस.पी.जगताप यांनी या वर्गाच्या तासातील किस्से सांगून भूतकाळ जागा केला.माजी प्राचार्य एस.डी.जगताप यांनी आशीर्वादपर विचार मांडले.कांही विद्यार्थीनींनी मन मोकळे करत कृतज्ञता व्यक्त केली.मराठी विषयाचे शिक्षक श्री.एस.एस.गायकवाड सर यांनी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अल्लडपणाच्या,बालपणाच्या आठवणी सांगून विद्यार्थ्यांचे चेहरे बोलके केले.कुसुमाग्रजांची कणा,फ.मुं.शिंदेची आई ही कविता सांगून महिला दिनाचे औचित्य साधत नारायण सुर्वे यांची असं पत्रात लिवा ही कविता सांगून कार्यक्रमाची रंगत वाढवली...कृतज्ञतेचे आभार व्यक्त करताना भावनिक वातावरणात सर्व बुडून गेले होते.सर्वाचा नामोल्लेख करणे शक्य नाही.क्षमस्व पण सागर पवार,दडस,संकेत जगताप, आणि सर्वच विद्यार्थी तसेच मुलींमध्ये शितल काटकर,तिची जीवलग मैत्रीण जगताप,छाया गायकवाड, सुर्यवंशी,गोलांडे,विडणीची पवार,शेवडे आणि नामोल्लेख न झालेल्या माझ्या विद्यार्थिनी.एकमेकांची जीवाभावाची चौकशी करत.प्रेमळपणाच्या भोजनाकडे पावलं वळली खरी ती अग्रहाच्या घासासाठी...पुन्हा तोच जिव्हाळा दाटून आला.. आणि निरोप घेतला पुन्हा भेटण्याच्या अटीवर प्रकृतीला जपा या गोड आशावादावर...घरी पोहचलो त्यावेळी प्रेमळपणाने दिलेली शाल,रंगीत फुलांचा गुच्छ, आयुष्य भर साथ दिलेला पेन न्याहळत होतो त्यावेळी त्यात मला माझ्या निरागस गोंडस विद्यार्थी- विद्यार्थीनींचे कृतज्ञतामय ओशाळलेले चेहरे दिसत होते पण ते जीवनाच्या थांब्यावरील सारे प्रवाशी घडीचे होते.