पुणे ! राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न
पुणे दि.२४: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. माधव कणकवळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
तंबाखूमुक्त तसेच आरोग्यसंपन्न समाजासाठी तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्यासोबतच विविध स्वंयसेवी संस्था, शाळा यांचा सक्रिय सहभाग घेत प्रभावी जनजागृती करावी. शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती जास्तीत जास्त व्हावी याकरिता जनजागृती करावी. तंबाखू मुक्त शाळा मोहिमेला गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ.सुहासिनी घाणेकर यांनी वर्षभरात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. कार्यक्रमाबाबत ४१ प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये २ हजार १७७ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. एक हजार ८८४ नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले. ग्रामीण आणि शहरी पोलिसांनी ५ कोटी १० लाख ७८ हजार रुपयांचा गुटखा आणि १० लाख ७३ हजार रुपयांचा हुक्का व इतर पदार्थ जप्त केले आहे. अन्न व औषध प्रशासनाने ३३२५ किलोग्रॅम प्रतिबंधित पदार्थ जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली.