बारामती ! आरोग्य विभागाकडून क्षयरोग दिन व साप्ताह साजरा
बारामती :बारामती पंचायत समिती अंतर्गत आरोग्य विभागाकडून 24 ते 29 मार्च दरम्यान बारामती शहर व तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेऊन क्षयरोग दिन व सप्ताह साजरा करण्यात आला.
दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शारदाबाई पवार नर्सिंग माहाविद्यालय, शारदानगर येथील कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी क्षयरोगावरील नियंत्रण, करावयाच्या उपाययोजना इत्यादीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रश्नमंजूषा व प्रतिज्ञा वाचन इत्यादी कार्यक्रमही पार पडले.
वसुंधरा रेडिओ वाहिनीवरुन क्षयरोग बाबत मार्गदर्शन करतांना डॉ. खोमणे यांनी क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असून भारतामध्ये सध्या दररोज 50 हजार लोकांना या आजाराचा संसर्ग होत असल्याचे सांगितले. बारामती तालुक्यात सन 2021-22 मध्ये 486 रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यातील 325 रुग्ण बरे झालेत व उर्वरित रुग्ण औषधोपचार घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व औद्योगिक वसाहत, बारामती येथेही क्षयरोग बाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
क्षयरोग दिन व सप्ताह कार्यक्रम पार पाडण्यासाठी सिल्वर ज्युबली उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सदानंद काळे, ग्रामिण रुग्णालय रुईचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनिल दराडे, डॉ. चाफाकानडे, वरिष्ठ पर्यवेक्षक प्रयोगशाळा एस. के. शेळे, विस्तार अधिकारी सुनिल जगताप, वरिष्ठ आरोग्य पर्यवेक्षक एम.एम. मोहिते, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व आरोग्य कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.