गुढीपाडव्याला 'पुणे अल्टर्नेट फ्युएल कॉन्क्लेव्ह' चे आयोजन - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने 'पुणे अल्टर्नेट फ्युएल कॉन्क्लेव्हचा शुभारंभ होत आहे. 'ग्रीन मोबिलिटी' उद्दिष्टाच्या दिशेने ही एका नव्या प्रवासाची सुरुवात असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कार्बनमुक्त वाहतूक क्षेत्र घडवताना या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून स्वच्छ व शाश्वत वाहतुकीस चालना देण्याचा मानस आहे. दरवर्षी होणाऱ्या या कॉन्क्लेव्हमुळे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ, भागीदार, लहान मोठे व्यवसाय, प्रशासकीय संस्था, शाश्वत ऊर्जा निर्माते सर्वच एका व्यासपीठावर येणार आहेत. तसेच एमआयडीसीसुद्धा पर्यायी इंधन निर्मात्यांना महाराष्ट्रात व्यवसाय स्थापण्यास प्रोत्साहित करू शकेल.
एमपीसीबी आणि एमआयडीसीच्या वतीने आणि एमसीसीआयएच्या सहकार्याने २ ते ५ एप्रिल २०२२ या कालावधीत पुण्यात या परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.